इच्छुकांकडून दिवाळी शुभेच्छांचा वर्षाव
By admin | Published: October 25, 2016 11:53 PM2016-10-25T23:53:49+5:302016-10-25T23:54:35+5:30
फलकबाजी : बायका - मुलांनाही आणले प्रकाशात
नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांपर्यंत जाऊन पोहोचण्यासाठी येऊ घातलेला दिवाळीचा सण म्हणजे महापर्वणीच. तीच संधी साधत इच्छुकांनी प्रभागातील घरोघरी दिवाळी शुभेच्छा देणाऱ्या पत्रकांचा वर्षाव सुरू केला असून, फलकबाजीलाही ऊत आला आहे. त्यातच काही नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी आपल्या बायका-मुलांनाही प्रकाशात आणत यंदाची निवडणूक ही घराणेशाहीचे दर्शन घडविणार असल्याची झलक दाखविण्यास सुरुवात केली आहे.
दिवाळीचा सण दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. महापालिका निवडणुकीत प्रभागाचा विस्तार व वाढलेली मतदारसंख्या पाहता उमेदवारांची मोठी कसोटी लागणार आहे. महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होणार असली तरी आतापासूनच निवडणुकीचे वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. त्यातच दिवाळीचा सण जवळ येऊन ठेपल्याने मतदारांपर्यंत जाऊन पोहोचण्याची नामी संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे इच्छुकांनी दिवाळी शुभेच्छा पत्रे छापत घरोघरी वाटप करण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे घरोघरी शुभेच्छा पत्रांचा खच पडू लागला आहे. दिवाळी शुभेच्छा पत्र देताना त्यात आपल्या राजकीय पक्षाची निशाणी तसेच प्रभाग क्रमांकाचा आवर्जून उल्लेख केला जात आहे. याशिवाय, इच्छुकांकडून शहरात फलकबाजीलाही ऊत आला आहे. ठिकठिकाणी परस्पर पॅनल तयार करत अप्रत्यक्षपणे आपली उमेदवारी घोषित झाल्याचेच इच्छुकांकडून भासविले जात आहे. त्यातूनच पक्षांतर्गत धुसफूसही पहायला मिळत आहे. काही प्रस्थापित नगरसेवकांसह राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत: रिंगणात उतरण्याची तयारी ठेवतानाच आपले वारसदार म्हणून बायका-मुलांनाही प्रकाशात आणले आहे.
शुभेच्छा पत्रासह फलकांवर त्यामुळे कुटुंबच झळकत असून बायका-मुलांचीही उमेदवारीसाठी दावेदारी सांगितली जात आहे. इच्छुकांच्या या फलकबाजी व पत्रकबाजीने मतदारांचे मात्र निखळ मनोरंजन होत आहे. (प्रतिनिधी)