बालकांसाठी दिवाळीच्या सुटीत वाचन पर्वणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 11:31 PM2019-10-27T23:31:07+5:302019-10-28T00:03:02+5:30
यंदाच्या वर्षापासून नाशिकमधील बालकांना खऱ्या अर्थाने पुस्तकांच्या खजिन्यात मनसोक्त रमण्याचा आनंद घेता येणार आहे.
नाशिक : यंदाच्या वर्षापासून नाशिकमधील बालकांना खऱ्या अर्थाने पुस्तकांच्या खजिन्यात मनसोक्त रमण्याचा आनंद घेता येणार आहे. या पुस्तक खजिन्यातील ७ हजाराहून अधिक गोष्टी आणि मनोरंजक कथासंग्रहांसह बालसाहित्य वाचनाचा आनंद बालकांना मोफत लुटता येणार आहे. त्याशिवाय यंदाच्या वर्षी नाताळच्या सुट्ट्यांमध्ये सावानाच्या वतीने प्रथमच सावाना बालसाहित्यिक मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याने यंदाच्या वर्षापासून वाचनप्रिय बालकांच्या सुट्ट्या खºया अर्थाने रंगणार आहेत.
नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने यंदाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्येच बालकांमध्ये वाचनचळवळ रुजवण्यासाठी त्यांना मोफत पुस्तके उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सावानाच्या बाल विभागातील तब्बल ७ हजार पुस्तके आता मुलांना मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. त्यामुळे सहामाही परीक्षेनंतर सुरु झालेल्या यंदाच्या दिवाळी सुट्टीपासून बालकांसाठी पुस्तकांचा उत्सव रंगणार आहे. सावानामध्ये स्वतंत्र दालन करण्यात आलेल्या बालविभागात बालवाचकांना त्यांना हवे ते पुस्तक त्यांच्या हाताने घेण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. तिथेच वाचनाची सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याने तिथे बसून किंवा घरी नेऊनदेखील पुस्तके वाचता येणार आहेत. त्याशिवाय या बालविभागात दोन संगणकांचीदेखील व्यवस्था करण्यात येणार असल्याने ज्या मुलांना आॅनलाईन पुस्तके वाचायची असतील, त्यांच्यासाठी ती सोयदेखील उपलब्ध राहणार आहे. बालकांना केवळ वाचनालयात आणणे इतकेच कर्तव्य पालकांना पार पाडावे लागणार आहे.
नोंदणीसाठी आवाहन
बालसाहित्यिक मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या स्वरचित कथा, कवितांच्या सादरीकरणातून उद्याच्या साहित्यिकांना व्यासपीठ मिळणार आहे. त्यासाठी राज्यभरातील पालकांनी त्यांच्या बालकांची नावनोंदणी ५ नोव्हेंबरपर्यंत करावी, असे आवाहन सावानातर्फे करण्यात आले आहे. त्यातील सहभागासाठी ५ ते २० वर्ष अशी वयोगटाची अट आहे.
पहिला बाल साहित्यिक मेळावा वर्षअखेरीस
सावानाच्या वतीने दरवर्षी जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे आयोजन केले जाते. त्या प्रथेला आता ५२ वर्ष पूर्ण झाल्यानंतर यंदाच्या वर्षापासून बाल साहित्यिक मेळाव्याचे आयोजन करण्याचा निर्धारदेखील सावानाने केला आहे. त्यानुसार येत्या डिसेंबरअखेरीस पहिल्या बालसाहित्यिक मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
सार्वजनिक वाचनालय, नाशिकच्या बालविभागातील पुस्तके मोफत उपलब्ध करुन दिल्यामुळे बालविश्वातील वाचन चळवळीला चालना मिळेल. तसेच विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल. भविष्यातील बालसाहित्यिक घडवण्यासाठी बाल साहित्य मेळावा अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे इच्छुक बालकांनी नाशिक सावानाशी संपर्क साधावा.
- संजय करंजकर,
बालविभाग प्रमुख ,सावाना