पितृपक्षासह वर्षातील ३६५ दिवस शुभच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:47 AM2018-09-25T00:47:51+5:302018-09-25T00:48:52+5:30
पितृपक्षाच्या पंधरवड्यात शुभ कार्य अथवा खरेदी करू नये, असा गैरसमज समाजात पसरलेला आहे.
नाशिक : पितृपक्षाच्या पंधरवड्यात शुभ कार्य अथवा खरेदी करू नये, असा गैरसमज समाजात पसरलेला आहे. मात्र यात तथ्य नसून पितृपक्षात कोणत्याही प्रकारची खरेदी करण्यास कोणतीही अडचण नसून गृहखरेदी, गृहप्रवेश, विवाहसोहळे, वाहन खरेदी, सोने-चांदीचे अलंकार खरेदीसाठी प्रत्येक दिवस शुभ आणि मंगलमय असल्याचे अनेक जोतिर्विंद्यांसह अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे. दैनंदिन खरेदी विक्रीच्या व्यवहारांतून व मालमत्ता खरेदीतून एकप्रकारे आपली प्रगतीच साधली असते, त्यामुळे प्रगतीचा दिवस पितृपक्षातील असला तरी तो अशुभ कसा असेल असा मतप्रवाहही समोर येऊ लागला आहे. पितृपक्ष म्हणजे पितरांना आवाहन करण्याचा पंधरवडा असून कुटुंबातील निधन झालेल्या व्यक्तींचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे. यंदा हा पंधरवडा २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबर पितृपक्ष असून या दिवसांमध्ये जवळच्या व्यक्तींना आठवून अन्न किंवा जलदान केले जाते. त्याचप्रमाणे अनेकजण आपल्या गेलेल्या व्यक्तीच्या आवडीच्या पदार्थांचे किंवा वस्तूंचे दान करते. या माध्यमातून पितरांच्या आत्म्यास शांती मिळो, अशी प्रार्थना केली जाते. परंतु, या काळात शुभकार्य करू नये अथवा खरेदीचे व्यवहार करू नये, अशी अंधश्रद्धा तथा गैरसमज आहे. त्यामुळे अनेकजण या पंधरवड्याला अशुभ मानून स्वत:च्या आणि देशाच्या आर्थिक प्रगतीला ब्रेक लावतात. पितृपक्षाला अशुभ समजणाऱ्यांमुळे बाजारपेठेत एका प्रकारची मंदी निर्माण होऊन देशाच्या अर्थ व्यवस्थेलाही त्याचा फटका बसतो. या अंधश्रद्धेमुळे बाजार व्यवस्था संथ होत होऊन अनेक जणांच्या रोजगाराचाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे एकीकडे पितृपक्षात अन्नदान करण्याची परंपरा असताना दुसरीकडे अप्रत्यक्षरीत्या कोणाचा तरी रोजगार हिरावला जाऊन त्याच्यावर उपासमारीची वेळ येत असल्याने अन्नदानाच्या मूळ संकल्पनेलाही छेद दिला जातो, असा विचारप्रवाह समोर येऊ लागला आहे. त्यामुळे यावर्षी अनंत चतुर्दशीच्या दुसºया दिवसापासून ते नवरात्रीच्या पूर्वसंध्येपर्यंत असलेल्या पितृपक्षातही बाजारपेठेत तेजीचे वातावरण दिसून येण्याचे संकेत आहे.
खरेदीसाठी कोणतीही अडचण नाही
पितृपक्षात कोणत्याही प्रकारची खरेदी करण्यास कोणतीही अडचण नसून गृहखरेदी, गृहप्रवेश, विवाह सोहळे, वाहन खरेदी, सोने-चांदीचे अलंकार खरेदीसाठी प्रत्येक दिवस शुभ आणि मंगलमय असल्याचे अनेक जोतिर्विंद्यांसह अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे.
खरेदी विक्रीच्या व्यवहारांतून व मालमत्ता खरेदीतून एकप्रकारे आपली प्रगतीच साधली असते, त्यामुळे प्रगतीचा दिवस पितृपक्षातील असला तरी तो अशुभ कसा असेल असा मतप्रवाहही समोर येऊ लागला आहे.
पितृपक्ष हा वाईट अथवा अशुभ नसतो. या कालावधीत आपले पितरे पृथ्वीवर येतात, असा समज असेल तर काहीकाळ अशुभ कसा असेल, उलट या काळात पितरांचे आशीर्वादच मिळतात. त्यामुळे या काळात घर, वाहन, सोने यांसह कोणतीही खरेदी करण्यास काहीत हरकत नाही. शास्त्रानुसार धन-धान्य देणारी पृथ्वी, जन्मदाते व पालनपोषण करणारे पितर आणि निर्मिती शक्ती असलेल्या नवदुर्गांचा उत्सव असा उत्सवांचा क्रम आहे. दैनंदिन व्यवहारात आपले जन्मदाते पालन पोषणकर्ते असलेल्या पितरांची विस्मृती होऊन नये, केवळ यासाठी पितृपक्षाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे या काळात केलेली कोणत्याही खरेदीला, व्यवसाय शुभारंभाला पितरांचे आशीर्वादच मिळत असल्याने पितृपक्षाचा कालावधी हा शुभ आणि मंगलच असतो. - दा. कृ. सोमन, खगोल अभ्यासक तथा पंचांगकर्ते
वर्षातील सर्वच दिवस सारखे असतात. त्यामुळे पितृपक्षासारखा विशिष्ट कालावधी अशुभ मानण्याला कोणतीही वैज्ञानिक बैठक नाही.नागरिकांनी अनेक दिवसांपासून त्यांच्या मनवार लादलेला हा अंधश्रद्धेचा पगडा झुगारून वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याची हिंमत दाखवायला हवी. आपले आर्थिक नियोजन पक्के असेल तर पितृपक्षात केलेले व्यवहार निश्चितच यशस्वी होतात. - प्राचार्य डॉ. किशोर पवार, विज्ञान अभ्यासक