हॅपी न्यू इअर..! दिवसभर शुकशुकाट : संध्याकाळनंतर गजबजले रस्ते; शहराबाहेरील पर्यटनस्थळांवर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 01:23 AM2018-01-01T01:23:21+5:302018-01-01T01:24:04+5:30
नाशिक : भले बुरे ते विसरून जाऊ या वळणावर... या वळणावर...! सरत्या वर्षातील कडू-गोड आठवणींची शिदोरी जवळ बाळगत नव्या वर्षाच्या स्वागताला सामोरे गेलेल्या नाशिककरांनी मध्यरात्री बाराच्या ठोक्याला अक्षरश: जल्लोष केला.
नाशिक : भले बुरे ते विसरून जाऊ या वळणावर... या वळणावर...! सरत्या वर्षातील कडू-गोड आठवणींची शिदोरी जवळ बाळगत नव्या वर्षाच्या स्वागताला सामोरे गेलेल्या नाशिककरांनी मध्यरात्री बाराच्या ठोक्याला अक्षरश: जल्लोष केला आणि हॅपी न्यू इअरच्या घोषात रात्र न्हाऊन निघाली. कुठे साग्रसंगीत पार्ट्या, तर कुठे मनोरंजनाचे कार्यक्रम...उत्सवी वातावरणात नव्या क्षणांचे आणि नव्या वर्षाचे स्वागत केले ते नव्या अपेक्षांच्या पूर्तीचा संकल्प करूनच!
नव्या वर्षाच्या स्वागताची उत्कंठा तशी दोन दिवसांपासूनच दिसून येत होती. नव्या वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कुटुंबीय तसेच मित्रपरिवारासमवेत बेतही तयार ठेवण्यात आले होते. सेलिब्रेशनचा हा उत्साह कॅश करण्यासाठी हॉटेल्स व्यावसायिक सरसावले होते. अनेक सेलिब्रेटी आणि डीजे नाशिककरांसाठी दाखल झाले होते. खानपान सेवा आणि सोबत धमाल नाच-गाणे अशा कार्यक्रमांची रेलचेल होती. याशिवाय नाशिक परिसरातील पर्यटनस्थळे, फार्म हाउस तसेच रिसॉर्टही गर्दीने भरले होते. तरुणाईला उधाण आले होते.
शुभेच्छा संदेशांचा वर्षाव
फेसबुक, व्हॉट््स अॅपसह सोशल मीडियावर शुभेच्छा संदेशांची देवाण-घेवाण सकाळापासूनच सुरू होती. कल्पक पद्धतीने शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने मध्यरात्री उशिरापर्यंत संदेशांची देवाण-घेवाण सुरू होती.