हॅप्पी न्यूज इयर : आदिवासींच्या बांबू हस्तकलेला मिळणार यांत्रिक बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:10 AM2021-01-01T04:10:36+5:302021-01-01T04:10:36+5:30
देवगावमधील सुमारे २५ ते ३० कुटुंबांना बांबूकला आत्मसात असून, ते पारंपरिक ज्ञानानुसार विविध वस्तू तयार करतात. त्यांच्यामधील बांबू हस्तकलेची ...
देवगावमधील सुमारे २५ ते ३० कुटुंबांना बांबूकला आत्मसात असून, ते पारंपरिक ज्ञानानुसार विविध वस्तू तयार करतात. त्यांच्यामधील बांबू हस्तकलेची आवड अन् असणारे गुण लक्षात घेत पूर्व वन विभागाने या ठिकाणी संयुक्त वन व्यवस्थापन समिती स्थापन केली. या समितीद्वारे लोकांना विश्वासात घेत स्वावलंबी जीवन जगण्यासाठी बांबू लागवड, उत्पादन आणि हस्तकलेला वाव देण्याचे ठरविले. सुमारे दोन वर्षांपूर्वी उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, सहायक वनसंरक्षक डॉ. सुजीत नेवसे यांनी याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून येथील काही तरुणांसह मध्यमवर्गीय बांबू कारागिरांची निवड केली. त्यांना नागपूर येथील ‘बीआरटीसी’ येथे बांबू कलेच्या प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. या आदिवासी बांधवांनी आपल्या पारंपरिक बांबू हस्तकलेला शास्त्रोक्त बारकावे आणि माहितीची जोड देत यांत्रिक आधाराच्या जोरावर विकसित करण्याचे धडे तेथे काही दिवस गिरविले. यानंतर देवगावमध्ये ‘सामूहिक सुविधा केंद्र’ (कॉमन फॅसिलिटी सेंटर) सुरू करण्याचा विचार वन विभागाने करत तो प्रत्यक्षात कृतीतून पूर्ण केला.
--इन्फो--
१५ लाखांचा निधी खर्च
बांबूच्या वस्तू घडविण्यासाठी उभारलेल्या केंद्रासाठी सुमारे १५ लाखांचा निधी खर्च करण्यात आला. हे केंद्र अस्तित्वात येण्यासाठी सुमारे दोन वर्षांचा कालावधी लागला. या केंद्रात बांबूपासून तयार करण्यात येणाऱ्या विविध शोभेच्या आणि वापराच्या वस्तुंसाठी लागणारी यंत्रसामग्रीदेखील वन विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. जानेवारीमध्ये या केंद्राचे लोकार्पण करण्याचा मानस चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
--इन्फो--
...असे आहे आधुनिक केंद्र
या केंद्रामध्ये बांबू कापणीसाठी लागणारी यंत्रणा तसेच बांबूच्या विविध वस्तू घडविण्यासाठी हवी असलेली साधनसामग्रीही यामध्ये मिलिंग यंत्र, ड्रील मशीन, ग्राइंडर, पॉलिश मशीनसह आदि यंत्रणा केंद्रात उपलब्ध करून देण्यात आली आहे. लवकरच बीआरटीच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या चमू या केंद्रात दाखल होणार असून, तेथील स्थानिक आदिवासी कारागिरांना बांबू कलेबाबत शास्त्रोक्त यांत्रिक प्रशिक्षण देणार आहे. यासाठी राज्याच्या बांबू मंडळाकडून प्रशिक्षणाचा खर्च उचलण्यात आला आहे. या केंद्रात एकाचवेळी ३० लोक एकत्र येऊन धडे गिरवू शकतात.
--कोट--
आदिवासी नागरिकांना रोजगार मिळावा आणि सामाजिक, आर्थिक विकासाच्या वाटेवर गाव पाडे गतिमान व्हावे, जेणेकरून वनांचा शाश्वत विकास घडून येण्यास मदत होईल. देवगावमधील पारंपरिक बांबू कलेला यांत्रिकीची जोड मिळाल्यानंतर अधिक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण आकर्षक बांबूच्या शोभेच्या आणि वापराच्या वस्तू घडविणे सोपे होणार आहे. यामुळे बाजारात या वस्तूंना मागणीबरोबर किंमतही मिळेल, हाच या केंद्राच्या उभारणीमागील उद्देश आहे.
-तुषार चव्हाण, उप-वनसंरक्षक, नाशिक पूर्व वन विभाग
---
फोटो आर वर ३१देवगाव आणि ३१देवगाव१ नावाने सेव्ह आहे.