प्रसन्न रहाणे हीच आयुष्याची गुरुकिल्ली
By admin | Published: September 7, 2015 10:12 PM2015-09-07T22:12:57+5:302015-09-07T22:13:39+5:30
प्रसन्न रहाणे हीच आयुष्याची गुरुकिल्ली
त्र्यंबकेश्वर : चांगले आणि शांत जीवन जगण्यासाठी मनुष्याला ध्येयापर्यंत पोहोचण्याचे मार्ग माहिती असणे गरजेचे असते. या मार्गाने तो प्रवास करीत राहिला, तर मोक्षप्राप्ती दूर नाही. आपण आपल्या बोलण्यातून आणि कृतीतून दुसर्याला वाईट वाटेल असे कोणतेही कृत्य करू नये, सदैव सर्वांशी प्रेमाने वागणार्या आणि ईश्वर आराधना करणार्यांना दु:खाची सावली कधीही झेलावी लागत नाही, अशा शब्दात निरंजनी आखाड्यातील महेशानंदगिरी यांनी विचार मांडले. आखाड्यात सुरू असलेल्या सत्संगदरम्यान भक्तांना ते मार्गदर्शन करीत होते. आपले बोलणे आणि कृती दोन्ही गोष्टींवरचा आपली स्थिती इतर कुणावर कधीही प्रेम न करणार्या, परंतु सर्व जगताने आपल्या प्रेमात पडावे, अशी इच्छा बाळगणार्या सुंदरी सारखी झाली आहे. हे जग देण्या-घेण्यावर चालते हे आपण विसरून जातो. आपण जसे पेरू तसेच उगवते हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे, असेही त्यांनी सांगितले. सध्या जगात प्रेम, सहिष्णूता, परोपकार, बंधूभाव यांची आवश्यकता आहे आणि दुर्दैवाने लोकांमध्ये त्याचाच अभाव दिसून येत असल्याचेही ते म्हणाले. स्वत: आनंदी रहा आणि दुसर्याला आनंदी ठेवा, असे धर्म सांगतो. तुम्ही दुसर्यांना जेवढा आनंद द्याल त्याच्या दुप्पट आनंद देव तुमच्या झोळीत टाकेल. प्रसन्न राहणे हा पैसे न खर्च करता सुखी रहाण्याचा मार्ग असल्याचे विज्ञानही सांगते. त्यामुळे सर्वांनी सदैव आनंदी रहाण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी केले.