पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर मनपा आयुक्तांची कठोर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 01:09 AM2019-05-22T01:09:21+5:302019-05-22T01:09:38+5:30
शहरासाठी असलेले मुबलक पाणी त्यातच होणारा अपव्यय यामुळे महापालिका आयुक्तांनी जलापव्यय करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
नाशिक : शहरासाठी असलेले मुबलक पाणी त्यातच होणारा अपव्यय यामुळे महापालिका आयुक्तांनी जलापव्यय करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. विशेषत: जिल्हा प्रशासनाने पाणीकपातीबाबतचा अभिप्राय मागविल्यानंतर प्रशासन अधिक सक्रिय झाले आहे.
गंगापूर धरणात पुरेसा साठा असून, जलसंपदा विभागानेच दिलेल्या आरक्षणानुसार मुकणे आणि दारणा धरणांतूनदेखील पाणी मिळत आहे. महापालिकेने आरक्षणानुसार पाण्याचा वापर सुरू केला आहे, मात्र जिल्ह्याच्या आणि राज्याच्या अनेक भागात दुष्काळसदृश स्थिती असून, पाण्याच्या टंचाईमुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे शहराच्या काही भागात पाण्याचा दुरुपयोग आणि अपव्ययदेखील होत आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाच्या रडारवर महापालिका असून, दि. १४ मे रोजी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या पत्रात महापालिका कसा वाढीव पाणीपुरवठ्याचा वापर करीत आहे याबाबतचा तपशील देतानाच पाणी काटकसरीने वापरण्यास सांगावे, असे नमूद करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानेदेखील महापालिकेला पत्र पाठविले असून, त्यात पाणी आरक्षण त्याचा वापर आणि पाणी कपातीबाबतचा अभिप्राय मागविण्यात आल्याचे महापालिकेच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने पाण्याची काटकसर करणे सुरू केले आहे. परंतु पाण्याचा अपव्यय करणाºयांवर कठोर कारवाईदेखील केली आहे. त्याचप्रमाणे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीदेखील तातडीने सर्व संबंधित नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
महापालिकेचा काटकसरीने वापर
महापालिकेच्या वतीने पाणी काटकसरीने वापरले जात असून, मुकणे धरणातून वापर सुरू झाल्यानंतर गंगापूर धरणातून होणारा जलउपसा कमी करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनानेदेखील अगोदरच काटकसर सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे.