काळ्या मातीतील कष्ट अनमोल; फसवणूक खपवून घेणार नसल्याचा प्रताप दिघावकरांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 03:01 PM2020-09-09T15:01:28+5:302020-09-09T15:12:18+5:30
मुळ नाशिकचा असल्यामुळे मला नाशिकसह आजुबाजुच्या जिल्ह्यांबद्दल सखोल माहिती आहे. या पाचही जिल्ह्यांमध्ये कायदासुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी माझे पोलीस दल सदैव प्रयत्नशील राहणार आहे.
नाशिक :नाशिक परिक्षेत्रातील अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या सुपीक जिल्ह्यांमध्ये द्राक्षे, कांदा, डाळींब, केळी, डाळींचे उत्पादक शेतकरी आहेत. काबाडकष्ट करुन काळ्या मातीत घाम गाळत शेतकरी शेतमाल पिकवितो; मात्र काही व्यापारी त्यांना त्यांच्या मालाचा हमीभाव तर देतच नाही; मात्र शेतमाल घेऊन पोबारा करतात अन् बनावट धनादेशरुपी कागदाचा तुकडा हातावर टेकवतात. यापुढे नाशिक परिक्षेत्रात बळीराजाची आर्थिक फसवणूक खपवून घेतली जाणार नाही, लबाडी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मुसक्या तत्काळ बांधल्या जातील या शब्दांत नाशिकच्या बागलाण तालुक्याचे भूमिपुत्र असलेले नवनिर्वाचित विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.प्रताप दिघावकर यांनी कडक इशारा दिला.
नाशिक परिक्षेत्राचे महानिरिक्षक म्हणून दिघावकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी पदभार स्विकारल्यानंतर बुधवारी (दि.९) कार्यालयातील सभागृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांच्या कायदासुव्यवस्थेचा धावता आढावा संबंधित पोलीस अधिक्षक, अपर पोलीस अधिक्षकांकडून जाणून घेतला आहे. त्यादृष्टीने निश्चित परिक्षेत्राचे पोलीस दल कोरोनाशी लढा देतात सक्षमपणे कायदासुव्यवस्थेची अंमलबजावणी करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
नाशिक परिक्षेत्रातील लोक सुज्ञ अन् शांतताप्रिय
मुळ नाशिकचा असल्यामुळे मला नाशिकसह आजुबाजुच्या जिल्ह्यांबद्दल सखोल माहिती आहे. या पाचही जिल्ह्यांमध्ये कायदासुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी माझे पोलीस दल सदैव प्रयत्नशील राहणार आहे. कोरोनाच्या संकटात नाशिक जिल्ह्यासह परिक्षेत्रातील अन्य जिल्ह्यांतसुध्दा रमजान ईद, बकरी ईद, गणेशोत्सव यासह विविध जयंतीउत्सव शांततेत पार पडले आहे. नाशिक परिक्षेत्रातील जनता तशी सुज्ञ व कायद्याचे पालन करणारी असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
मला भेटण्यासाठी ‘अपॉईन्टमेंट’ची गरज नाही
मी जनतेचा सेवक असून पोलीस शिपायापासून तर सर्वसामान्य व्यक्तीकरिता माझ्या दालनाचे दरवाजे कार्यालयीन वेळेत खुले राहणार आहेत. तसेच माझ्या वैयक्तिक भ्रमणध्वनी क्रमांकावर ९७७३१४९९९९ कोणी कधीही कायदासुव्यवस्थेसंदर्भात थेट संपर्क साधू शकतो, असे ते म्हणाले. मला भेटण्यासाठी कुठलाही दुवा किंवा अपॉइन्टमेंटची गरज सर्वसामान्यांना भासणार नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले, अशाप्रकारे आपला मोबाईल क्रमांक जाहीर करणारे ते नाशिक परिक्षेत्राचे पहिलेच विशेष महानिरिक्षक असावे.