नारायणाच्या मंत्रघोषात रंगला ‘हरिहर भेट’ सोहळा

By Admin | Published: November 12, 2016 11:22 PM2016-11-12T23:22:58+5:302016-11-12T23:23:50+5:30

वैकुंठ चतुर्दशी : गोरज मुहूर्तावर झाला तुलसीचा शाही विवाह

'Harihar visit' ceremony in color of Narayana | नारायणाच्या मंत्रघोषात रंगला ‘हरिहर भेट’ सोहळा

नारायणाच्या मंत्रघोषात रंगला ‘हरिहर भेट’ सोहळा

googlenewsNext

 नाशिक : झेडूंच्या फुलांचे आकर्षक तोरण, शेवंतीच्या फुलांच्या वेण्या अन् गुलाब-मोगऱ्याचा दरवळणारा मंद सुगंध हरिहर भेट महोत्सवा दरम्यान सुंदरनारायण मंदिरात भाविकांना अनुभवायला मिळाला. रविवार पेठेतील सुंदरनारायण मंदिरात हरिहर भेटी महोत्सवानिमित्त फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली असून शनिवारी (दि. १२) तुलसी विवाह आणि हरिहर भेट सोहळ्यासाठी भाविकांनी विशेष गर्दी केली होती.
कार्तिक शुक्ल दशमी ते प्रतिपदा या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या महोत्सवाची जय्यत तयारी मंदिरात करण्यात आली असून, सुंदरनारायण मंदिराच्या गर्भगृहात मध्यभागी सूर्यनारायणाची (विष्णू) मूर्ती, विष्णूच्या उजव्या हाताला देवी लक्ष्मी आणि डाव्या बाजूला वृंदा (तुळस) आणि त्यांच्या पुढ्यात असणारे गरूड वाहन आकर्षक फुलांच्या सजावटीने भक्तांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी वृंदा देवीचे कंठी, चिंचपेटी, चंद्रहार या अलंकारातील रूप तर लक्ष्मीहार आणि कंठीहारातील नारायणाचे रूप अधिकच खुलून दिसत होते. शनिवारी (दि. १२) वैकुंठ चतुर्दशीला गोरज मुहूर्तावर नारायणाचा वृंदा देवीसोबत गोरज मुहूर्तावर पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा झाला. वैकुंठ चतुर्दशीला संध्याकाळी विवाह झाल्यानंतर मध्यरात्री हरिहर भेटीचेदेखील आयोजन संस्थानतर्फे करण्यात आले होते.
शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजता श्री सुंदरनारायण मंदिर येथे श्री सुंदर नारायण आणि कपालेश्वर यांची भेट झाली. वर्षभर नारायणाला तुळस आणि महादेवाला बेल वाहण्यात येत असला तरी वैकुंठ चतुर्दशीच्या रात्री मात्र महादेवाला वाहिलेला बेल नारायणाला वाहण्यात आला तर नारायणाला वाहिलेली तुलसीपत्रे महादेवाला वाहण्यात आली. तुलसीपत्रात नारायणाचा अंश आणि बेलपत्रात महादेवाचा अंश असल्याचा शास्त्रात उल्लेख असल्याने हरिहर भेटीत तुलसीपत्र आणि बेलपत्रांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. संपूर्ण भारत देशात हरिहर भेट फक्त नाशिकलाच होत असल्याने या महोत्सवासाठी देशभरातील विविध भागांतून भाविक दर्शनासाठी आले होते. कार्तिक शुद्ध दशमी गुरुवारपासून (दि. १०) सुरू झालेल्या हरिहर भेट महोत्सवाची कार्तिक शुद्ध प्रतिपदेला मंगळवारी (दि. १५) सूर्यास्तानंतर रामकुंड येथे होणाऱ्या अवभृत स्नानाने सांगता होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Harihar visit' ceremony in color of Narayana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.