हॉटस्पॉट मालेगावमध्ये पुनश्च हरिओम!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 03:35 AM2020-06-12T03:35:14+5:302020-06-12T03:35:23+5:30
कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३ टक्के, आता फक्त ५५८ जण बाधित
धनंजय वाखारे ।
नाशिक : दाट लोकवस्ती, अज्ञान आणि अफवांचे होणारे संक्रमण, त्यातून प्रशासकीय व आरोग्य यंत्रणेशी पुकारलेला असहकार या प्रमुख कारणांमुळे जिल्ह्यात कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेले मालेगाव शहर आता सावरू लागले असून परिस्थिती नियंत्रणात येत आहे. शहरात बाधितांची संख्या ८५८ वर जाऊन पोहोचली असतांना आजमितीला मालेगावमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३ टक्के इतके आहे. त्यामुळे कोरोनाचा हॉटस्पॉट पुनश्च हरिओम म्हणण्याच्या तयारीला लागला आहे.
मालेगावी ६४ दिवसांत ६४ बळी घेणाऱ्या कोरोनाचा वाढता संसर्ग साºयाच यंत्रणेला आव्हान देणारा ठरला आणि सामूहिक प्रयत्नातून ‘मिशन रिलीफ मालेगाव’ सुरु झाले. शहरात दि. ८ एप्रिल रोजी एकाच वेळी ५ रुग्ण कोरोनाबाधित आढळले होते तर नाशिक जिल्ह्यातील पहिला बळीही मालेगावच्याच बाधित रुग्णाचा गेला. तेथून मालेगावी कोरोनाने आपले हात-पाय पसरायला सुरुवात केली आणि मालेगाव कनेक्शनचा धोका संपूर्ण जिल्ह्याला उरात धडकी भरवणारा ठरला. बाधित आणि बळी यांची संख्या वेगाने वाढू लागली आणि प्रशासकीय यंत्रणा मुळापासून हादरली. अकार्यक्षम अधिकाऱ्यांच्या उचलबांगड्या करण्यात आल्या. प्रशासनाकडून यंत्रणेचे मनोबल उंचावतानाच कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक लागणाºया सोयी-सुविधांसह सुरक्षित साधनांची उबलब्धता करून देण्यात आली. दाट लोकवस्तीत वास्तव्य करणाºया नागरिकांचे युद्ध पातळीवर सर्वेक्षण केले गेले, रुग्णांचे ट्रेसिंग करून त्यांच्यावर योग्य प्रकारे उपचार सुरू करण्यात आले, बाधितांचे मनोधैर्य उंचावण्यासाठीही प्रयत्न झाले. परिणामी अज्ञान आणि अफवांच्या बाजारात गुंगलेले नागरिक हळूहळू तपासणीसाठी घराबाहेर पडू लागले. संपूर्ण रमजान काळात संक्रमणाचा सर्वाधिक धोका होता, परंतु पोलीस यंत्रणेने अडथळ्यांची शर्यत पार करत परिस्थिती संयमाने आणि हुशारीने हाताळली. नाशिक आणि धुळे येथे स्वाब नमुना तपासणीसाठी लॅब कार्यान्वित झाल्याने अहवाल वेगाने येण्यास सुरुवात होऊन तत्काळ उपचार करणेही शक्य झाले. त्यामुळे मालेगावमधील मृत्युदर घटत गेला. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले. आतापर्यंत एकूण ८५८ बाधितांमधून तब्बल ७१२ रुग्ण पूर्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर सद्यस्थितीत ८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पोलीस यंत्रणेचे कौशल्य अन् सतर्कता
मालेगावमधील कोरोनाचा वाढता संसर्ग शासनालाही डोकेदुखी ठरला होता. शासनाने सर्वप्रथम यंत्रणेत खांदेपालट केली. यापूर्वी मालेगावी अपर पोलीस अधीक्षकपदी काम पाहिलेले आणि तेथील स्थानिक लोकांशी उर्दू, अरेबिक, फारसी भाषेत सवांद साधत कायदा व सुव्यवस्था सांभाळणारे सुनील कडासने यांची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती केली गेली.
लॉक डाऊन काळात पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिह यांनी मालेगावी तळ ठोकला. १४० पोलीस कर्मचाºयांना कोरोनाची बाधा झाली. अशा स्थितीत त्यांनी पोलिसांचे मनोबल ढळू दिले नाही. पोलीस यंत्रणेचे कौशल्य आणि सतर्कता यामुळेही मालेगावी कोरोना आटोक्यात आणणे शक्य होत गेले.
प्रशासनाचा समन्वय
जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी एकूण साºया परिस्थितीवर लक्ष ठेवत समन्वयाची बाजू हाताळली. मनपा आयुक्त दीपक कासार यांना कोरोनाची बाधा झाली होती. पण त्यांनीही कोरोनावर मात करत ‘शो मस्ट गो आॅन’ म्हणत महापालिका यंत्रणा कामाला लावली. सुमारे १८ डॉक्टरही बाधित झाले होते. पण आरोग्य यंत्रणेनेही हार न मानता कोरोनाशी लढा दिला.