हरिश्चंद्र गड : सावंत ट्रेकर्स ग्रूपच्या मदतीला धावले नाशिकचे गिर्यारोहक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 14:44 IST2020-01-19T14:38:16+5:302020-01-19T14:44:40+5:30
रॅपलिंग करून खाली आलेल्या त्यांच्या ग्रूपच्या सदस्यांना ‘ट्रेकसोल’च्या नाशिकयेथील गिर्यारोहक जे कॅम्पेनिंगकरिता थांबलेले होते. त्यांनी सकाळी रोहिदास गडावर ट्रेकिंगचा बेत रद्द करत सावंत ग्रूपचे गिर्यारोहक रॅपलिंगद्वारे खाली गेलेले आहे, त्यांना ‘रेस्क्यू’ करत वरच्या बाजूने सुरक्षित बाहेर काढण्याचा ‘टास्क’ हाती घेतला

हरिश्चंद्र गड : सावंत ट्रेकर्स ग्रूपच्या मदतीला धावले नाशिकचे गिर्यारोहक
नाशिक : हरिश्चंद्रगडावरट्रेकिंगसाठी गेलेले राज्याचे लाडके गिर्यारोहक अरूण सावंत यांचा दुर्दैवी अपघात होऊन निधन झाले. त्यांच्यासोबत असलेल्या ३० अन्य ट्रेकर्सपैकी सुमारे अकरा सहभागी सदस्यांना नाशिकच्या ट्रेकर्सच्या चमूने सुखरूप खिरेश्वर गावात आणले.
सह्याद्रीच्या खोऱ्यातील विविध गड-किल्ल्यांवरील अवघड वाटा सर करणारे अभ्यासू गिर्यारोहक अरूण सावंत यांचा डोंगरदºयाच्या कुशीतच अपघाती मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह रविवारी (दि.१९) आढळून आला. सावंत हे तीस गिर्यारोहकांच्या ग्रूपला घेऊन हरिश्चंद्रगडावर शनिवारी रॅपलिंगकरिता पोहचले होते. रॅपलिंगचा पहिला टप्पा पुर्ण करून त्यांच्या ग्रूपचे गिर्यारोहक खाली आले तेव्हा तेदेखील रॅपलिंगद्वारे कोकणकड्यावरून खाली येत होते; मात्र अचानकपणे त्यांचा ग्रूपशी संपर्क तुटला आणि ते संध्याकाळी बेपत्ता झाले. सुमारे दोन हजार फूट उंची कोकणकड्याची आहे. कोकणकड्यापासून जिथून सावंत यांचा संपर्क तुटला ती उंची एक हजार फूटांची आहे. रॅपलिंग करून खाली आलेल्या त्यांच्या ग्रूपच्या सदस्यांना ‘ट्रेकसोल’च्या नाशिकयेथील गिर्यारोहक जे कॅम्पेनिंगकरिता थांबलेले होते. त्यांनी सकाळी रोहिदास गडावर ट्रेकिंगचा बेत रद्द करत सावंत ग्रूपचे गिर्यारोहक रॅपलिंगद्वारे खाली गेलेले आहे, त्यांना ‘रेस्क्यू’ करत वरच्या बाजूने सुरक्षित बाहेर काढण्याचा ‘टास्क’ हाती घेतला. सर्व अत्यावश्यक साधने असल्यामुळे डॉ. अजय धोंडगे, डॉ. अजय जाधव, डॉ. हेमंत बोरसे, प्रसाद कुलकर्णी यांनी रविवारी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत त्या ग्रूपच्या एकूण ११ सदस्यांना सुखरूप ठाणे जिल्ह्यातील खिरेश्वर गावात आणले. हे सर्व ट्रेकर्स रात्री मुक्कामी गडावर थांबलेले होते. रविवारी त्यांचा रोहिदास गड चढण्याचा बेत होता; मात्र त्यांनी सावंत यांची दुर्दैवी घटना घडल्याने रद्द केला. हे नाशिककर गिर्यारोहक मुळ वैनतेय गिरीभ्रमण संस्थेशी जोडलेले आहे. डोंगरांवर झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये हौशी पर्यटकांचा अधिक समावेश आहे. अपवादानेच गिर्यारोहकांचे अपघाती मृत्यू घडले आहेत, मात्र त्याचे प्रमाण हे अत्यंत कमी असल्याचे वैनतेय संस्थेचे प्रशांत परदेशी यांनी सांगितले. सावंत हे मुरब्बी गिर्यारोहकांपैकी एक होते. त्यांचा अपघाती मृत्यू होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे परेदशी म्हणाले.