वाहतूक बेटांची हरवली शोभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:45 AM2018-02-24T00:45:02+5:302018-02-24T00:45:02+5:30
चौकाचौकांतील सौंदर्य फुलावे यासाठी खासगी उद्योजक आणि व्यावसायिकांच्या मदतीने महापालिकेने वाहतूक बेटे साकारली खरी; परंतु नंतर संबंधित प्रायोजकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि पालिकेनेही. परिणामी वाहतूक बेटांचे सौंदर्य हरपले असून, अनेक ठिकाणी तर वाहतूक बेटांचे भग्नावशेष शिल्लक आहेत.
नाशिक : चौकाचौकांतील सौंदर्य फुलावे यासाठी खासगी उद्योजक आणि व्यावसायिकांच्या मदतीने महापालिकेने वाहतूक बेटे साकारली खरी; परंतु नंतर संबंधित प्रायोजकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि पालिकेनेही. परिणामी वाहतूक बेटांचे सौंदर्य हरपले असून, अनेक ठिकाणी तर वाहतूक बेटांचे भग्नावशेष शिल्लक आहेत. शहराचे सुशोभिकरण म्हटले की वाहतूक बेटे असे पालिकेचे समीकरण ठरलेले असून, अनेक संस्थांना त्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले जाते. संबंधित चौकांच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळत असल्याने प्रचार आणि प्रसाराच्या उद्देशाने अनेक व्यावसा-यिक संस्था आकर्षक वाहतूक बेटे साकारून देतात. परंतु ही बेटे साकारल्यानंतर देखभाल आणि दुरुस्तीकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याने कालांतराने वाहतूक बेटांची अवस्था बिकट होत जाते. अनेक ठिकाणी तर रंग उडालेला आणि शिल्प मोडकळीस आलेले अशी अवस्था असते. त्यामुळे चौकाचे सुशोभिकरण दूरच, उलट विद्रुपीकरण होताना दिसते. अनेक वाहतूक बेटांमध्ये हिरवळ लावली जाते किंवा झाडेही लावली जातात; परंतु उन्हाळ्यात पाणी न मिळाल्यास हिरवळ खराब होते. सध्या अशीच स्थिती जाणवत आहे. प्रायोजकांकडून हिरवळ जगविण्याचे कोणतेही प्रयत्न होत नाहीत. काही ठिकाणी कारंजे किंवा धबधबे बंद पडले असून, ते सुधारण्याचेदेखील प्रयत्न होत नाही. महापालिकेच्या वतीने अनेकदा करार करणाºया संस्थांनी देखभाल दुरुस्ती न केल्यास नोटीस देण्याची भाषा केली जाते; परंतु प्रत्यक्षात अशा वाहतूक बेटांमध्ये कोणतीही सुधारणा केली जात नाही. परिणामी अनेक वाहतूक बेटांची वर्षानुवर्षे दुरवस्था कायम आहे.
म्हणे वीज मोफत द्या...
महापालिकेत मनसेची सत्ता असताना महापौर अॅड. यतिन वाघ यांनी प्रायोजकांची बैठक बोलावली होती. त्यात देखभाल दुरुस्तीसाठी वाहतूक बेटांची जबाबदारी घेण्याबाबत चर्चा होत असताना अनेक प्रायोजक व्यावसायिकांनी वाहतूक बेटासाठी महापालिकेच्या पथदीपावरून मोफत वीज तसेच कारंजा आणि तत्सम उपक्रमांसाठी मोफत पाण्याची मागणी केली. त्यामुळे अशा प्रकारच्या अपेक्षेने वाहतूक बेट फुलविणाºयांचे शहराप्रती दायित्व किती, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.