हातरूंडीचा गावगाडा दीड वर्षापासून चालतोय सरपंचाविना
By admin | Published: December 17, 2015 11:17 PM2015-12-17T23:17:08+5:302015-12-17T23:18:46+5:30
हातरूंडीचा गावगाडा दीड वर्षापासून चालतोय सरपंचाविना
पेठ : तालुक्यातील हातरूंडी येथील विद्यमान सरपंचांनी दीड वर्षापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला असला तरीही आपर्यंत या ग्रामपंचायतीला नवीन सरपंच लाभला नसल्याने विना सरंपच गावगाडा सुरू असून याबाबत दिरंगाई क करण्यात येत आहे असा सवाल येथील सामाजिक कार्यकर्ते अंबादास सातपूते यांनी निवेदनाद्वारे केला आहे़
विभागीय आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात सातपूते यांनी म्हटले आहे की, सरपंचांनी राजीनामा दिल्यानंतर सहा महिन्यांच्या आत नव्याने सदरचे पद लोकशाही मार्गाने भरणे आवश्यक असते़ याबाबत हातरूंडी येथील ग्रामसेवकांनी पंचायत समितीला प्रस्ताव सादर केला आहे़
पंचायत समितीनेही विहित वेळेत तहसीलदार कार्यालयात विहित वेळेत प्रस्ताव सादर करूनही येथील तहसील कार्यालयात सदर प्रस्तावच गहाळ झाल्याचे निदर्शनास आल्याने हातरूंडीबरोबर आंबे, जांभूळमाळ, देवगाव, दोनावडे येथील रिक्त ग्रामपंचायत सदस्य व शेवखंडी, नाचलोंढी येथील सरपंच पदाच्या प्रक्रिया पूर्ण झाल्या असताना नेमकी हातरूंडी येथील निवड प्रक्रिया का थांबवण्यात आली हे गुलदस्त्यात राहिले आहे़
सातपुते यांनी तक्रार केल्यानंतर तहसील प्रशासनाने तत्काळ पंचायत समितीकडून
नव्याने प्रस्ताव मागवून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठवला आहे़; मात्र एकाच सामूहिक प्रस्तावातून नेमके हातरूंडी गाव कसे वगळले याचा उलगडा ग्रामस्थांना झालेला दिसून येत नाही़ (वार्ताहर)