धोकादायक वृक्षांचे मनपा करणार पुनर्रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 01:46 AM2019-10-12T01:46:51+5:302019-10-12T01:48:11+5:30

शहरात रस्त्याच्या मधोमध असलेले काही वृक्ष महापालिकेला उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे हटविता येत नाही आणि दुसरीकडे या झाडांवर आदळून वाहनचालकांचे अपघात होत आहेत. त्यावर उपाय म्हणून आता या जुन्या वृक्षांचे शास्त्रोक्त पद्धतीने पुनर्रोपण अन्यत्र करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत. त्यामुळे हा प्रश्न लवकरच सुटेल, असा विश्वास प्रशासन व्यक्त करीत आहेत.

Harvesting of Endangered Trees | धोकादायक वृक्षांचे मनपा करणार पुनर्रोपण

धोकादायक वृक्षांचे मनपा करणार पुनर्रोपण

googlenewsNext
ठळक मुद्देआदेशाचा तिढा : तोडगा काढण्याचा प्रयत्न

नाशिक : शहरात रस्त्याच्या मधोमध असलेले काही वृक्ष महापालिकेला उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे हटविता येत नाही आणि दुसरीकडे या झाडांवर आदळून वाहनचालकांचे अपघात होत आहेत. त्यावर उपाय म्हणून आता या जुन्या वृक्षांचे शास्त्रोक्त पद्धतीने पुनर्रोपण अन्यत्र करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत. त्यामुळे हा प्रश्न लवकरच सुटेल, असा विश्वास प्रशासन व्यक्त करीत आहेत.
महापालिकेच्या वतीने शहराच्या विविध भागात रस्ते विकसित करताना रस्त्याच्या कडेला आणि मधोमध असलेली झाडे तोडावी लागणार होती. मात्र वृक्षप्रेमींनी उच्च न्यायालयात दाद मागितल्याने हा विषय न्यायालयासमोर गेला. न्यायालयाने वड, पिंपळ, उंबर यांसारखी झाडे तोडू नये असे आदेश दिले, परंतु त्यामुळे वेगळाच तिढा निर्माण झाला असून, एकाच रांगेतील काही झाडे हटविण्यात आली. मात्र काही झाडे जैसे थे ठेवावी लागली आहेत. काही ठिकाणी रस्ता रुंदीकरणामुळे ही झाडे रस्त्याच्या मधोमध आली असून, त्यावर आदळून अपघात होत आहेत. पंचवटीत तर दोन युवकांचा मृत्यू झाला होता. गंगापूररोड येथेदेखील एका उद्योजकाच्या मुलाचा झाडावर मोटार आदळून मृत्यू झाला होता. बुधवारी (दि.९) गंगापूररोडवर भोसला कॉलेजच्या समोरच असलेल्या रस्त्यातील झाडावर आदळून एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता.
दरम्यान, महापालिकेकडे सुमारे १६७ अशा रस्त्यातील धोकादायक वृक्षांची यादी आहे. तर मध्यंतरी पोलिसांनीदेखील २२ धोकादायक झाडांची यादी महापालिकेला सादर केली होती. त्याचा विचार करता आता महापलिकेच्या वतीने झाडे तोडता येत नसली तरी त्यांचे अन्यत्र पुनर्रोपण करण्याचा विचार सुरू आहे.
अभ्यासपूर्ण प्रस्ताव
शास्त्रोक्त पद्धतीने कोणतेही झाड तोडून अन्यत्र लावायचे असेल तर किमान तीन महिने कालावधी लागतो, परंतु झाड वाचते. त्याचा विचार करून तसा प्रस्ताव उच्च न्यायालयात सादर करण्याचे प्रयत्न सुरू असून, उच्च न्यायालयाने ते मान्य केल्यास सुवर्ण मध्य निघू शकतो, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Web Title: Harvesting of Endangered Trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.