पालकमंत्र्यांनी कुत्ता गोळी खाल्ली आहे का?; संजय राऊत यांचा घणाघात
By Suyog.joshi | Published: October 20, 2023 02:54 PM2023-10-20T14:54:18+5:302023-10-20T14:55:50+5:30
ड्रग्जविरोधात नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा एल्गार
नाशिक (सुयोग जाेशी) : स्वातंत्र्यवीर सावरकर, कुसुमाग्रजांची देवभूमी आता ड्रग्जमाफियांची भूमी झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात नशेत बुडाला असून आजचा मोर्चा म्हणजे नाशिककरांसाठी लढाई असल्याचे सांगत नाशिकच्या पालकमंत्र्यांनी कुत्ता गोळी खाल्ली आहे का? असा घणाघात शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला.
शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे शुक्रवारी ड्रग्जविरोधात मोर्चा काढण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना राऊत यांनी शिष्टमंडळासह निवेदन दिले. मोर्चात मोठ्या संख्येने महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, शिवसेना पदाधिकारी सहभागी झाले होते. मोर्चात ‘पालकमंत्री वाचवा, अंमली पदार्थ बंद करा, पालकमंत्री हटाव, नाशिक बचाव’ घोषणा देत वातावरण दुमदुमून सोडले. यावेळी बोलतांना राऊत म्हणाले, शिवसेना नाशिककरांसाठी रस्त्यावर उतरली आहे. नाशिकला ड्रग्जमाफिया बनविणाऱ्या सरकारविरोधात आमचा आक्रोश असून इकडे आमचा मोर्चा सुरू असताना तिकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत पत्रकार परिषद घेत आहेत. वास्तविक पाहता फडणवीस यांनी या मोर्चाला सामोरे जायला हवे होते. परंतु ते तेथे पत्रकार परिषद घेत बसले. ड्रग्जप्रकणी सरकार गांभिर्याने विचार करत नाही. ताेपर्यंत सरकारला आम्ही सोडणार नाही असा इशारा देत राऊत म्हणाले, ड्रग्जप्रकरणात गृहमंत्री, पालकमंत्री राजकारण करत आहे. ड्रग्जप्रकरणात कोणाला किती खोके दिले जातात याचा सर्व हिशोब पालकमंत्र्यांना माहिती आहे. पालकमंत्र्यांनी कुत्ता गोळी खाल्ली आहे का असा प्रश्न विचारत या मालेगावच्या कुत्ता गोळीचा पहिल्यांदा बंदोबस्त करा, अन्यथा आम्ही शांत बसणार नाही असा इशारा राऊत यांनी दिला.
उद्धव, आदित्य ठाकरे यांचा फाेन
सकाळी शिवसेना नेते उद्वव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचा फोन येऊन गेला. ते म्हणाले, आपल्याला नाशिक वाचवायचे आहे. ही लढाईची सुरूवात आहे. त्यात सर्वांनी सहभाग घ्यावा. आपल्याला ड्रग्जविरोधात लढा द्यायचा आहे. त्यामुळे ही निकराची लढाई लढण्यासाठी प्रत्येकाने तयार राहावे असे आवाहनही त्यांनी केले.
मोठ्या भाभीला १५ लाखांचा हप्ता
छोट्या भाभीला अटक केली. मग १५ लाखांचा हप्ता घेणाऱ्या मोठ्या भाभीचे काय? असा प्रश्न विचारत राऊत यांनी ड्रग्जच्या व्यापारातून किती खोके मंत्र्यांना दिली जातात याचा तपास करा. नाशिकची तरूणपिढी या ड्रग्जपायी वाया जात असून ड्रग्जमाफियांकडून नाशिक शहराचा नाश होत असल्याचा आरोप राऊत यांनी केला.