येवला तालुक्यातील कांदा उत्पादक हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 05:32 PM2019-01-04T17:32:23+5:302019-01-04T17:33:22+5:30
कांद्याचे माहेर घर म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात दोन ते अडीच महिन्यांपासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण सुरू असल्याने येवला तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.
एकीकडे कांद्याच्या दरात घसरण सुरु असतानाही दुसरीकडे लाल कांद्याची लागवड देखील मोठ्या प्रमाणात केली जात आहे. मानोरी बुद्रुक परिसरात सध्या लाल कांद्याच्या काढणीला शेतकऱ्यांनी सुरु वात केली आहे. परंतु बरेच शेतकरी आपला लाल कांदा प्रतवारी नुसार काढत असल्याचे बघायला मिळत आहे. लाल कांद्याला शेतक-यांनी प्रतिएकर सुमारे ४३ हजार रु पयांच्या खर्च केला असून सध्याचे दर लक्षात घेता खर्च फिटणे देखील आवाक्याबाहेर झाले आहे. यंदा निसर्गाने पाठ फिरवल्याने दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असून कांदे करपून गेल्याने अनेक शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या परिस्थितीत दिसत आहेत. त्यात पंधरा दिवसांपूर्वी पालखेड डावा कालव्यातून शेती सिंचनासाठी आवर्तन सुरू असताना देखील मानोरी बुद्रुक (खडकीमाळ) येथील वितरिका क्र .२५ ला पाण्याअभावी वंचित राहिल्याने रब्बी हंगामातील पिकांना फटका बसला असून लाल कांद्याची पुरेशी वाढ झाली नाही. १ ते २ पाण्याअभावी कांदे बारीक स्वरूपात राहून गेल्याने कांदा उत्पादनात घट झाल्यामुळे शेतक-यांच्या चिंतेत पुन्हा भर पडली आहे.