एसटीने प्रवास करताय सॅनिटायझर घेतलंय ना?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:12 AM2021-06-04T04:12:23+5:302021-06-04T04:12:23+5:30
नाशिक: मागील कोरोनाच्या लाटेत संकटात सापडलेल्या एस.टी. महामंडळाला यंदाही कोरोनाचा फटका बसला. जानेवारीत बस सुरू करण्यात आल्यानंतर दोन महिने ...
नाशिक: मागील कोरोनाच्या लाटेत संकटात सापडलेल्या एस.टी. महामंडळाला यंदाही कोरोनाचा फटका बसला. जानेवारीत बस सुरू करण्यात आल्यानंतर दोन महिने महामंडळाला उत्पन्न मिळण्यास सुरूवात झाल्याने काहीअंशी कामगारांची देखील चिंता मिटली होती,परंतु मार्चच्या मध्यावर पुन्हा लॉकडाऊन झाल्याने एस.टी.ची चाके थांबली होती. दोन महिन्यांनंतर निर्बंध काही प्रमाणात शिथिल झाल्यामुळे एस.टी.ची चाके पुन्हा रस्त्यावर आली; मात्र अजूनही अपेक्षित प्रतिसाद नसल्याने महामंडळापुढील चिंता कायम आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक मृत्यू झाल्याचा धसका अनेकांनी घेतला आहे. त्यामुळे शक्यतो पाहिजे तितकी लोक खबरदारी घेऊ लागले आहेत. गर्दीत जाण्याचे टाळले जात असले तरी खबरदारी घेऊनच बाजारात लोक फिरताना दिसतात. मात्र बसमधून प्रवास करण्यास अजूनही लोक फारसे उत्सुक नसल्याचे दिसते. त्यामुळे बस सुरू झालेल्या असल्या तरी त्यांना प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. सध्या केवळ ४७ बस सुरू असून त्याही प्रवाशांचा प्रतिसाद असेल तेव्हाच सोडल्या जात आहेत.
---इन्फो--
जिल्ह्यातील एकूण बस
३००
सध्या सुरू असलेल्या बस
४७
एकूण कर्मचारी
४५००
सध्या कामावर वाहक
९४
सध्या कामावर असलेले चालक
९४
वाहक
१९००
चालक
२१००
--इन्फो--
ना मास्क ना सॅनिटायझर
बसमध्ये कुठेही सॅनिटायझर लावण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा ही त्यांच्यावरच अवलंबून आहे. मास्क लावण्याची खबरदारी प्रवासी घेत असले तरी काही प्रवासी मात्र बेफिकिरीने वागत असल्याचेही दिसून आले. चालक, वाहकांकडून प्रवाशांना मास्क वापरण्याचे सांगितले जात आहे.
--इन्फो--
अंदाजे ७० लाखांचा तोटा
नाशिक विभागाचे महिन्याचे उत्पन्न साधारणपणे १ कोटी इतके असते; मात्र कोरोनामुळे यावर परिणाम आला असून सध्या सुरू असलेल्या बसच्या माध्यमातून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने महामंडळाला अंदाजे दरमहा ७० लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे. दैनंदिन आलेले उत्पन्न डिझेलसाठीच खर्च करावे लागत आहे.
--इन्फेा--
प्रवासी घरातच
सार्वजनिक वाहनातून प्रवास करणे प्रवासी टाळत असल्याने महामंडळाच्या बसमध्ये पुरेशा संख्येने प्रवासी नसल्याचे दिसते. प्रवासी हे घरातच राहणे पसंत करीत असून काही प्रवासी आवश्यक असल्यास खासगी किंवा स्वत:च्या वाहनांचा वापर करीत आहेत.
--इन्फो--
सर्वाधिक वाहतूक धुळे मार्गावर
१)सद्यस्थितीत सुरू असलेल्या बसपैकी सर्वाधिक वाहतूक ही धुळे मार्गावर सुरू आहे. या मार्गावर सध्या ९ बस शिफ्टमध्ये धावत आहेत. त्याखालोखाल पुणे शहरासाठी बस सोडल्या जात आहेत. या ठिकाणी ४ बस सुरू असून या शिवशाही बस आहेत.
२) मालेगावसाठी देखील बस वाढत आहेत. सध्या ४ बस या मार्गावर धावत असून प्रवाशांचा प्रतिसाद या बसला चांगला असल्याचे दिसून आले. या मार्गावर आणखी बस वाढण्याची शक्यता आहे.
३) ग्रामीण भागात येवला, लासलगाव, मनमाड, इगतुपरी, नांदगाव, कळवण, पेठ, सटाणा, सिन्नर या तालुक्यांच्या ठिकाणी बस सोडण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील ही महत्त्वाची तालुक्यातील ठिकाणे आहेत.
--इन्पो--
बस सुरू झाली आणि जीवात जीव आला
मागील दोन वर्षांपासून महामंडळाची अवस्था कठीण झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली होती. आता बस सुरू झाल्यामुळे पुन्हा दिलासा मिळाला आहे. जून महिन्याचे वेतन मिळाले असले तरी मे महिन्याचे वेतन किती मिळणार याची देखील चिंता आहे. आता बस सुरू झाल्याने त्यातूनही मार्ग निघेल असे वाटते.
- शांताराम नांदूरकर, चालक
महामंडळाला अनेकदा अडचणीचा सामना करावा लागलेला आहे. परंतु संकटाच्या काळात महामंडळाने नेहमीच एस.टी.ची सुविधा पुरविली आहे. कर्मचाऱ्यांनी देखील कोरोनाच्या काळात सेवा करून महामंडळाला साथ दिली आहे. आता बस नियमित सुरू झाल्याने दिलासा मिळाला आहे.
- शिवाजी राऊत, वाहक