कोरोनाचा कहर : जिल्ह्यात १४८ कोरोनाग्रस्तांची वाढ; शहरात १०६ नवे रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 07:08 PM2020-06-25T19:08:01+5:302020-06-25T19:09:30+5:30

जिल्ह्यातील सिन्नरपाठोपाठ आता इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी या तालुक्यांमध्येही कोरोनाचा फैलाव वेगाने होऊ लागला आहे. जिल्ह्यातील पेठ तालुका कोरोनापासून अद्याप तरी सुरक्षित राहिला आहे.

Havoc of corona: Increase of 148 corona victims in the district; 106 new patients in the city | कोरोनाचा कहर : जिल्ह्यात १४८ कोरोनाग्रस्तांची वाढ; शहरात १०६ नवे रूग्ण

कोरोनाचा कहर : जिल्ह्यात १४८ कोरोनाग्रस्तांची वाढ; शहरात १०६ नवे रूग्ण

googlenewsNext
ठळक मुद्दे१८५४ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले उपचारादरम्यान बरे होण्याचा सरासरी वेग ५६.०८ टक्के एकूण ६३८ नमुन्यांचा अहवाल अद्याप येणे बाकी

नाशिक : लॉकडाऊन शिथिलतेनंतर सातत्याने जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा वाढताना दिसत आहे. गुरूवारी (दि.२५) जिल्ह्यात नव्याने १४८ रूग्ण आढळून आले त्यापैकी १०६ रुग्ण नाशिक शहरात तर उर्वरित ग्रामिण भागात २९ आणि जिल्ह्याबाहेरील ११ रूग्णांचा समावेश आहे. अद्याप १९९ कोरोनाबाधित रूग्णांचा उपचारादरम्यान जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आकडा आता ३ हजार ३०६ इतका झाला आहे. तसेच १८५४ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत.
कोरोना आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाची आरोग्य यंत्रणा युध्दपातळीवर प्रयत्नशील जरी असली तरी अद्याप कोरोनाचा आकडा कमी होताना दिसून येत नाही. शहरासह ग्रामिण भागातदेखील कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होऊ लागला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात अद्याप कोरोनाचा शिरकाव झालेला नव्हता; मात्र मागील तीन दिवसांपासून या तालुक्यातील हरसूल गावातसुध्दा आता कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत आहे.
गुरूवारी संध्याकाळी जिल्हा शल्य चिकित्सकांना प्राप्त झालेल्या अहवालानुसार इगतपुरी-५, येवला-६, पिंपळगाव बसवंत-३, ओझर-१, मनमाड-१, त्र्यंबकेश्वर-१, हरसूल-४, धुलवड (सिन्नर)-१, दिंडोरी-२, पिंपरी रवळस-१, अहेरगाव-५, देवळाली-१, म्हाळसाकोरे-१, विंचूर-१ अशी रूग्णसंख्या आहे. मालेगावची रूग्णसंख्या स्थिरावली असून गुरूवारी कोणताही नवा रूग्ण मालेगाव मनपा हद्दीत आढळून आलेला नाही.
जिल्ह्यातील सिन्नरपाठोपाठ आता इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी या तालुक्यांमध्येही कोरोनाचा फैलाव वेगाने होऊ लागला आहे. जिल्ह्यातील पेठ तालुका कोरोनापासून अद्याप तरी सुरक्षित राहिला आहे.
नाशिक ग्रामिण भागात अद्याप कोरोनाने ३६ लोकांचा बळी घेतला आहे तर नाशिक शहरात ८१ लोक मृत्यूमुखी पडले आहेत. मालेगावात ७१ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून जिल्हाबाहेरील ११ रूग्ण नाशकात उपचारादरम्यान दगावले आहेत. जिल्ह्याचा रूग्णांचा उपचारादरम्यान बरे होण्याचा सरासरी वेग ५६.०८ टक्के इतका आहे. जिल्ह्यातील एकूण ६३८ नमुन्यांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. त्यामध्ये मालेगाव मनपाचे २६८ तर नाशिक मनपाचे २९४ आणि नाशिक ग्रामिणचे ७६ नमुने प्रलंबित आहेत.

Web Title: Havoc of corona: Increase of 148 corona victims in the district; 106 new patients in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.