ह.भ.प. बंडातात्या कऱ्हाडकर यांची मुक्तता करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:12 AM2021-07-17T04:12:21+5:302021-07-17T04:12:21+5:30
राज्यातील सर्वात मोठा संप्रदाय असलेल्या वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. बंडातात्या कऱ्हाडकर यांना सरकारने पंढरपूर पायी वारीच्या पार्श्वभूमीवर स्थानबद्ध केले आहे. ...
राज्यातील सर्वात मोठा संप्रदाय असलेल्या वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. बंडातात्या कऱ्हाडकर यांना सरकारने पंढरपूर पायी वारीच्या पार्श्वभूमीवर स्थानबद्ध केले आहे. सरकारच्या या वर्तनाने महाराष्ट्रातील संपूर्ण वारकरी समाजात प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. सरकार एकीकडे निवडणुका पार पाडत आहेत. राजकीय सभा घेतल्या जात आहेत. दारूची दुकाने खुलेआम सुरू आहेत, मात्र गेल्या दोन वर्षांपासून भाविकांचे श्रद्धास्थान असलेली मंदिरे बंद आहेत. वारकऱ्यांची पंढरपूरची वारी बंद आहे. याला ज्यांनी विरोध केला अशा अखिल वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या ह.भ.प. बंडातात्या कऱ्हाडकर यांना स्थानबद्ध करून सरकारने एकप्रकारे वारकऱ्यांचा अपमान केला आहे. कऱ्हाडकर यांची त्वरित मुक्तता करून मंदिरावरील तसेच वारकरी संप्रदायाच्या धार्मिक कार्यक्रमांवरील निर्बंध त्वरित मागे घेऊन सांप्रदायिक कार्यक्रमास परवानगी द्यावी, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदनावर महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. श्रावण महाराज आहिरे, ह.भ.प. भरत महाराज मिटके, लहूदास महाराज अहिरे, शिवाजी ठाकरे, सुदाम दाणे, विवेक नांदुर्डीकर व लक्ष्मण दिवटे, कल्पना ठाकरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
(फोटो १४ वारकरी) वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. बंडातात्या कऱ्हाडकर यांची मुक्तता करावी, या मागणीचे निवेदन तहसीलदार डी. के. धांडे यांना देताना ह.भ.प. भरत महाराज मिटके. समवेत ह.भ.प. लहूदास अहिरे, शिवाजी ठाकरे, सुदाम दाणे, विवेक नांदुर्डीकर, लक्ष्मण दिवटे आदी.