एचसीजी मानवतामध्ये मोबाइल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:23 AM2021-02-06T04:23:47+5:302021-02-06T04:23:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : जागतिक कर्करोग दिनानिमित्त एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये एका मोबाइल कॅन्सर स्क्रीनिंग युनिटचे उद्घाटन प्रख्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जागतिक कर्करोग दिनानिमित्त एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये एका मोबाइल कॅन्सर स्क्रीनिंग युनिटचे उद्घाटन प्रख्यात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते व नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कर्करोग दिनानिमित्त एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर व कॅनकनेक्ट फाउंडेशन यांच्या वतीने ही जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे. ‘आय कॅन, आय विल’ हे ब्रीदवाक्य घेऊन या वर्षी सर्वत्र कर्करोग दिन साजरा केला गेला. या मोहिमेअंतर्गत या युनिटमध्ये विनामूल्य कर्करोग तपासण्या करण्यात येणार आहेत. तसेच पौरुषग्रंथी, स्तन, गर्भाशयाचे मुख, तोंड यांचा कर्करोग असणाऱ्या गरजू रुग्णांना विनामुल्य किमोथेरपी औषधे देण्यात येणार आहेत. या प्रसंगी मृणाल कुलकर्णी यांनी सांगितले की प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असून वेळोवेळी आरोग्याची तपासणी करणे गरजेचे आहे. मात्र आता ही मोबाईल लक्झरी व्हॅनव्दारे मिळणाऱ्या सुविधेचा लाभ महिलांनी आणि नागरिकांनी करुन घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले. या प्रसंगी बोलतांना डॉ. राज नगरकर म्हणाले, जर लवकर निदान झाले तर प्राण वाचू शकतात. ६५ टक्के लोकांना कर्करोग झाल्याचे फार उशिरा समजते, म्हणून सतर्क राहून प्रत्येकाने नियमितपणे आपल्या तपासण्या करून घेणे आवश्यक ठरते. हे मोबाइल स्क्रीनिंग युनिट गावोगावी जाऊन तपासण्या करणार आहेत व कोणास कर्करोगाची लागण झाली असल्याचे लक्षात आल्यास त्या रुग्णास योग्य ते वैद्यकीय मार्गदर्शन करुन पैशाअभावी उपचार राहू देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. रत्ना रावखंडे, दातार कॅन्सर जेनेटिक्सचे चेअरमन राजन दातार, दातार कॅन्सर जेनेटिक्सच्या संचालक डॉ. दर्शना पाटील आदी उपस्थित होते.
फोटो
०४ मानवता कॅन्सर
एचसीजी मानवतामध्ये मोबाइल कॅन्सर स्क्रीनिंग युनिटचा शुभारंभप्रसंगी पूजन करताना अभिनेत्री मृणाल कुलकर्णी. समवेत राजन दातार, डॉ. राज नगरकर, राजन दातार, मनपा आयुक्त कैलास जाधव, डॉ. रत्ना रावखंडे आदी.