प्रसूतीसाठी पत्नीला दाखल केले अन् पैशांचे पाकीट हरविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:19 AM2021-09-05T04:19:28+5:302021-09-05T04:19:28+5:30
राऊत हे पत्नीला प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात घेऊन आले होते. घाईगडबडीमध्ये अनावधानाने त्यांच्याकडून खिशातील पाकीट गहाळ झाले. राऊत यांच्या हा ...
राऊत हे पत्नीला प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात घेऊन आले होते. घाईगडबडीमध्ये अनावधानाने त्यांच्याकडून खिशातील पाकीट गहाळ झाले. राऊत यांच्या हा प्रकार लक्षात आला असता त्यांनी रुग्णालय पिंजून काढले मात्र पाकीट सापडले नाही. या पाकिटात पाच हजार रुपये, आधारकार्ड व अन्य कागदपत्रे हाेती. हेच पाकीट शनिवारी (दि. ४) दुपारी १२ वाजता सोमनाथ तुकाराम जाधव (रा. राैळसपिंप्री, ता. निफाड) यांना सापडले. जाधव हेदेखील त्यांच्या पत्नीला औषधोपचारासाठी रुग्णालयात घेऊन आले होते. त्यांनी पाकीट सिव्हिलच्या पोलीस चौकीत आणून जमा केले.
चाैकीतील ग्रामीण हवालदार अजय नाईक, शिपाई संदीप माळेकर, हवालदार राऊत यांनी पाकीट तपासून बघत आधारकार्डाद्वारे अंबादास यांच्याशी संपर्क साधला त्यांची खातरजमा करुन घेत पाकीट त्यांच्या स्वाधीन केले. आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या अंबादास यांना रोख रकमेसह हरविलेले पाकीट पुन्हा जैसे-थे अवस्थेत सापडल्याने त्यांनी पोलिसांचे आभार मानले.
--कोट--
मी दिंडोरी तालुक्यातील हनुमंतपाडा येथील रहिवासी आहे. काबाडकष्ट करुन आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. बायकोच्या प्रसूतीसाठी कष्टाचे जमविलेले पाच हजार रुपये घेऊन जिल्हा रुग्णालयात आलो; मात्र उपचाराच्या घाईगडबडीत पैसे असलेले पाकीट हरविले आणि लोकांकडून ऊसनवार पैसे घेण्याची वेळ आली; मात्र ज्या भल्या माणसाला पाकीट सापडले त्यांनी ते इमानेइतबारे पोलिसांपर्यंत आणून दिले आणि मला रकमेसह पाकीट मिळाले, याचा खूप आनंद झाला कारण पैशांपेक्षा वेळ महत्त्वाची होती, त्यामुळे या पैशांना माझ्या दृष्टीने खूपच किंमत होती.
-अंबादास राऊत, रहिवासी, हनुमंतपाडा
040921\04nsk_53_04092021_13.jpg
हरविलेले पाकिट पुन्हा परत करताना पोलीस