घरातून रोकड घेत अंगणातून कारही लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:16 AM2020-12-31T04:16:05+5:302020-12-31T04:16:05+5:30
गोविंद बाबुलाल मालविया (रा.गायत्री रो-हाऊस) यांनी अंबड पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार मालविया कुटुंबीय रविवारी (दि.२७) रात्री आपल्या घरात असताना अज्ञात ...
गोविंद बाबुलाल मालविया (रा.गायत्री रो-हाऊस) यांनी अंबड पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार मालविया कुटुंबीय रविवारी (दि.२७) रात्री आपल्या घरात असताना अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास येत त्यांच्या घराची खिडकी उघडी असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी बेडरुममधील टेबलावर ठेवलेला मोबाईल आणि ड्राॅवरमधील दोन हजारांची रोकड अगोदर लांबविली. यानंतर तेथून पोबारा करताना चोरट्यांनी चक्क घरापुढे उभी असलेली कारही (एमएच १५ जीए ४३६८) पळवून नेली. याप्रकरणी अंबड पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार रंजन बेंडाळे करीत आहेत.
----
मदतीसाठी हात पुढे केला अन् दुचाकीला मुकला
नाशिक : एका बनावट गरजू युवकाने स्वत:ला दुचाकीची मदत हवी असल्याचा बनाव रचत मदत म्हणून दिलेली दुचाकी चोरट्याने गायब केली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनीत रमेश इंगळे (५२, रा.शिरसगाव, ता. निफाड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. इंगळे गेल्या बुधवारी (दि.२३) कामानिमित्त शहरात आले होते. सायंकाळच्या सुमारास ते काठे गल्लीतील त्रिकोणी गार्डन भागात एका चहाच्या टपरीवर थांबले असता ही घटना घडली. चहा घेत असताना एक तरुण तेथे आला व त्याने ‘थोड्या अंतरावर महत्त्वाचे काम आहे, तुमची गाडी देता का’ असे सांगून त्यांच्याकडे दुचाकीची मागणी केली. यावेळी इंगळे यांनी त्यांची दुचाकीची (एमएच १५ एफवाय ९५०१) किल्ली त्याच्या हाती सोपविली. त्या भामट्याने इंगळे यांची दुचाकी घेऊन कायमचाच पोबारा केला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----
चक्कर येऊन पडल्याने कामगाराचा मृत्यू
नाशिक : काम करीत असताना चक्कर येऊन पडल्याने कारखाना कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना औद्योगिक वसाहतीत घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शेखर भगवान कोरडे (४८, रा.निगळ पार्क जवळ,शिवाजीनगर) असे मृत कामगाराचे नाव आहे. कोरडे औद्योगिक वसाहतीतील पीसीएम फोजझीन अॅण्ड सॅमसिंग या कारखान्यात कामास होते. मंगळवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास कारखान्यात काम करीत असताना अचानक चक्कर आल्याने ते जमिनीवर कोसळले होते. मार्केटिंग व्यवस्थापक हरपालसिंग यांनी त्यांना तातडीने सिक्ससिग्मा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सूत्रांनी मृत घोषित केले. अधिक तपास हवालदार सूर्यवंशी करीत आहेत.