कोयत्याने हल्ला करून तृतीयपंथीयाचा हात मनगटातून कापला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:15 AM2021-05-13T04:15:39+5:302021-05-13T04:15:39+5:30
पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील वैशालीनगर भागात राहणाऱ्या फिर्यादी पीडित महिलेच्या घरी संशयित बागूल पाठीला कोयता लावून सोमवारी (दि.१०) मध्यरात्री ...
पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील वैशालीनगर भागात राहणाऱ्या फिर्यादी पीडित महिलेच्या घरी संशयित बागूल पाठीला कोयता लावून सोमवारी (दि.१०) मध्यरात्री आला. यावेळी त्याने जुन्या भांडणाची कुरापत काढून फिर्यादी महिलेसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी महिलेने त्यास भांडण का केले? असा जाब विचारला असता संशयिताने पाठीला लावलेला कोयता काढून तिच्या अंगावर वार केला. यावेळी महिलेची मैत्रीण असलेल्या तृतीयपंथीयाने तिला वाचविण्यासाठी धाव घेतली असता संशयिताने तृतीयपंथीयाच्या हातावर कोयत्याने वार केला. यामध्ये मनगटापासून तिचा डाव्या हाताचा पंजा कापला गेला. या धक्कादायक घटनेनंतर संशयिताने महिलेच्याही अंगावर वार करून तिलाही जखमी करत घरातून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक भगत, सहायक निरीक्षक एस. जी. डंबाळे या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. दोघा जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. याप्रकरणी फिर्यादी पीडित २२ वर्षीय युवतीच्या तक्रारीवरून पंचवटी पोलिसांनी संशयित कोयताधारी बागूल यास अटक केली असून, त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
---इन्फो--
प्रेमसंबंधाच्या संशयातून हल्ला
फिर्यादी पीडित युवतीसोबत तृतीयपंथीयाचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून संशयित बागूल हा वारंवार फिर्यादी महिलेच्या घरी जाऊन वाद घालत होता. या वादाचे पर्यावसान सोमवारी मध्यरात्री हाणामारीत झाले. यावेळी संशयित बागूल याने ‘तुमची कटकटच मिटवितो...’ असे म्हणत कोयत्याने हल्ला चढविला. या हल्ल्याच तृतीयपंथीयाचा डावा पंजा तुटला तसेच डोक्यावरही कोयता मारल्याने गंभीर दुखापत झाली, तर महिलेच्या डाव्या पायावर वार करून गंभीररीत्या जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.