‘तो’ अर्धवट जळालेला मृतदेह नाशिकच्या युवकाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2022 01:59 AM2022-04-29T01:59:55+5:302022-04-29T02:00:14+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्यातील वैतरणा धरणाजवळ दोन दिवसांपूर्वी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून, त्याचे नाव मुजाहिद ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील वैतरणा धरणाजवळ दोन दिवसांपूर्वी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून, त्याचे नाव मुजाहिद ऊर्फ गोल्डी अफजल खान (राहणार वडाळा, नाशिक) असल्याचे निष्पन्न झाले आहे. अतिशय क्रूरपणे तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याचा खून केल्यानंतर धारगावजवळ वैतरणा धरण परिसरात निर्जन स्थळी त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
या प्रकरणी अज्ञात संशयितांविरोधात खुनाचा व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा घोटी पोलिसात दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याची उकल करण्याचे आव्हान घोटी पोलिसांपुढे उभे ठाकले होते. खून झालेली व्यक्ती व खून करणाऱ्यांना शोधण्याचे मोठे कठीण काम होते.
आढळलेली मृत व्यक्ती ही मुजाहिद ऊर्फ गोल्डी अफजल खान (२४) असून, नाशिकच्यागुन्हेगारी जगतातील आहे. अनेक दिवसांपासून विविध गुन्ह्यांत तो तडीपार होता. त्याचे वास्तव्य इगतपुरी तालुक्यातच असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गुन्हेगारी विश्वातील गोल्डीच्या विरोधी गटाने त्याचा काटा काढल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस सूत्रांनी वर्तविला आहे. या खून प्रकरणात ४ ते ५ जणांचा सहभाग असल्याचा अंदाज असून, संबंधितांचा कसून शोध सुरू आहे.
गोल्डीचा खून करून त्याचा मृतदेह वैतरणा धरणाजवळ आणला की, या परिसरातच हा खून केला, याबद्दल अजून कुठल्याही प्रकारचा तपास लागला नाही. घोटी पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कामगिरी केली असून, २ दिवसांत खून झालेल्या व्यक्तीचा तपास लागला आहे. लवकरच खून करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या जाणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी घोटीचे साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांचे पथक अधिक तपास करीत आहे.
इन्फो
गोल्डी होता तडीपार गुंड
नाशिक येथील सराईत गुन्हेगार मुजाहिद ऊर्फ गोल्डी अफजल खान हा तडीपार होता. त्याचे गुन्हेगारी टोळीशी जवळचे संबंध होते. विविध गुन्हेही त्याच्या नावावर नोंदलेले आहेत.
विरोधी टोळीने बदला घेण्याच्या इराद्याने हा खून केला का? याचा शोध घेण्यात येत आहे.
----///////-