‘टेस्ट ड्राइव्ह’च्या बहाण्याने कार घेऊन पळाला अन् पोलिसांच्या नाकाबंदीत अडकला
By अझहर शेख | Published: August 23, 2023 03:36 PM2023-08-23T15:36:46+5:302023-08-23T15:37:23+5:30
कारचे जीपीएस लोकेशन जव्हार रस्त्यावर दिसून आल्याने तेथे पोलिसांना माहिती कळवून पोलिसांनी नाकाबंदी करून संशयित कारचालकाला ताब्यात घेतले.
नाशिक : मोटार खरेदीचा बहाणा करत पाथर्डीफाटा येथील एका कार मॉलमधून टेस्ट ड्राइव्हसाठी १९ लाखांची कार घेऊन निघालेल्या संशयिताने पेठरोडवरून मेरीच्या दिशेने धूम ठोकली. यावेळी सोबत असलेल्या व्यक्तीने डायल ११२वर कॉल करून माहिती कळविली. यानंतर म्हसरूळ पोलिसांनी घटनास्थळ गाठले; मात्र संशयित कारचालक हा फरार झाला होता. कारचे जीपीएस लोकेशन जव्हार रस्त्यावर दिसून आल्याने तेथे पोलिसांना माहिती कळवून पोलिसांनी नाकाबंदी करून संशयित कारचालकाला ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी कपिल अशोक नारंग (४१,रा.गंगापूर रोड) यांच्या मालकीचे वाहन खरेदीविक्रीचे मॉल आहे. मंगळवार (दि२२) दुपारी दीड वाजेच्या सुमारास याठिकाणी एक व्यक्ती कार घेण्यासाठी आला. त्यांना तेथील कर्मचारी फरीद शेख यांनी ग्राहकाच्या म्हणण्यानुसार एमजी इलेक्ट्रिक गाडी दाखविली. यानंतर त्या व्यक्तीने टेस्ट ड्राइव्ह घ्यायची आहे, असे सांगितले. एमजी इलेक्ट्रिक कार (जीजे २६ एबी ४८४८) या कारमधून संशयित ग्राहक व कर्मचारी शेख हे दोघेही मॉलमधून बाहेर पडले.
त्यानंतर दुपारी तीन वाजता कार मॉलमध्ये फिर्यादी नारंग यांना शेख यांनी फोनद्वारे ग्राहकाला गाडी आवडली म्हणून टोकन घेण्यासाठी घरी मेरी येथे जात असल्याचे सांगितले. त्यावेळी सदर ग्राहकाला लघुशंका लागल्याने मेरी रस्त्यावर त्याने वाहन थांबवले.त्यावेळी संशयित ग्राहक व शेख दोघेही कारमधून खाली उतरले. संशयिताने यावेळी लवकर कारमध्ये बसून शेख यांना रस्त्यावर सोडून देत पेठरोडने भरधाव पोबारा केला. शेख यांनी हा प्रकार नारंग यांना कळविला. त्यानंतर त्यांनी डायल ११२ला कॉल करून माहिती कळविली. म्हसरूळ पोलिसंनी घटनास्थळी जाऊन माहिती घेत बिनतारी संदेश यंत्रणेवर माहिती दिली. संशयित ग्राहक मनोज प्रकाश साळवे (३६,रा.एकतानगर, बोरगड) यास पोलिसांनी अटक केली आहे.
जीपीएस लोकेशनवरून लागला थांगपत्ता -
फिर्यादी नारंग यांनी इलेक्ट्रीक कारचे जीपीएस लोकेशन ट्रॅक केले असता ही कार जव्हार रस्त्यावर असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी पुन्हा पोलिस नियंत्रण कक्षात संपर्क साधून माहिती कळविली. तसेच लोकेशनच्या दिशेने कार मॉलचे दोन्ही कर्मचारी दुसऱ्या वाहनाने रवाना झाले. तोपर्यंत जव्हार येथे नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी संशयित साळवे यास कारसह ताब्यात घेतले होते. तेथील पोलिसांनी इंदिरानगर पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांचे गुन्हे शोध पथकाचे सागर परदेशी, मुश्रीफ शेख यांनी संशयित साळवे यास ताब्यात घेतले.