‘ते’ ज्येष्ठ कलावंत साकारतात बोधीपर्णावर बुध्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 02:44 PM2018-08-04T14:44:35+5:302018-08-04T14:51:59+5:30
कलेवर प्रामाणिकपणे प्रेम करणाऱ्या या ७२वर्षीय तरुण कलावंताचे आगळे वैशिष्ट म्हणजे बोधीवृक्षाच्या पर्णावर कुंचल्याचा बहुरंगी आविष्कार. तथागत गौतम बुद्धांचे एकापेक्षा एक सरस बोलक्या भावमुद्रा या कलाप्रेमीने आपल्या कुंचल्यातून लिलयापणे बोधीपर्णावर साकारल्या आहेत हे विशेष!
नाशिक : एखादा छंद जेव्हा मनुष्य जोपासतो तेव्हा त्याच्या मनात एकाकीपणाची भावना येऊ शकत नाही, हे तितकेच खरे आहे; मात्र एकापेक्षा अधिक छंद जोपासत एखादी व्यक्ती जगत असते तेव्हा त्याचे ते जगणे तितकेच समृद्ध असते, याचा प्रत्यय नाशिकमधील उपनगरच्या अरुण जाधव यांची भेट घेतल्यावर सहज येतो.
कलेवर प्रामाणिकपणे प्रेम करणाऱ्या या ७२वर्षीय तरुण कलावंताचे आगळे वैशिष्ट म्हणजे बोधीवृक्षाच्या पर्णावर कुंचल्याचा बहुरंगी आविष्कार. तथागत गौतम बुद्धांचे एकापेक्षा एक सरस बोलक्या भावमुद्रा या कलाप्रेमीने आपल्या कुंचल्यातून लिलयापणे बोधीपर्णावर साकारल्या आहेत हे विशेष!
गांधीनगर मुद्रणालयातून जाधव सेवानिवृत्त झालेले जाधव हे उपनगरमधील दत्तप्रसाद अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांनी लहानपणीचा मित्र सुरेश सोनवणेकडून कला आणि त्यावर प्रेम कसे करायचे ते शिकले. चित्रकलेचा कुठलाही शास्त्रशुद्ध अभ्यासक्रम न शिकता केवळ आवड आणि छंद म्हणून जोपासलेल्या कलेद्वारे जाधव हे एखाद्या कला महाविद्यालयाच्या चित्रकारालाही लाजवेल अशा एकापेक्षा एक सरस चित्राकृती रेखाटतात. त्यांच्या चित्राकृती कॅन्व्हासवर अधिक आकर्षक दिसतातच; मात्र त्यापेक्षाही अधिक सुंदर व लक्षवेधी बोधी वृक्षाच्या पर्णावर (पिंपळपान) दिसतात. भगवान गौतम बुद्धांच्या विविध भावमुद्रा त्यांनी पिंपळपानावर रेखाटल्या आहेत. त्यांनी यासाठी मेटालिक, अॅक्रेलिक रंगाचा वापर केला आहे, तसेच बुद्धांचे काही चित्र तैलचित्र पक्रारातील आहे.
पिंपळपानालाच बनविले कॅनव्हास
जाधव यांनी कॅनव्हासवर कुंचल्याचा आविष्कार दाखविण्यास तितकी पसंती दिली नाही जितकी पिंपळाच्या पानाला दिली. या कलाप्रेमी चित्रकाराने पिंपळाचे पान भिजवून ते वाळल्यावर त्यामध्ये हुबेहूब व्यक्तीचित्र रेखाटण्याची वेगळीच कला शिकली आहे. जाळीदार पिंपळाचे पान हे या कलाकाराचे आवडते कॅनव्हास आहे.
यावर चित्र रेखाटण्याचे अद्भुत तंत्र जाधव यांना अनुभवातून आत्मसात झाले आहे. पिंपळपानावर त्यांनी रेखाटलेल्या सर्व चित्राकृती जणू त्या न्याहाळत असलेल्या व्यक्तींशी संवादच साधतात. इतक्या बोलक्या आणि आकर्षक रंगसंगतीची जोड असलेल्या या चित्राकृती जिवंत वाटतात.