महिला बॅँक कर्मचाऱ्याच्या गळ्याला चाकू लावत तो म्हणाला ‘जगण्यासाठी दहा लाख द्या...’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 06:39 PM2020-09-08T18:39:13+5:302020-09-08T18:42:08+5:30
नाशिक : वेळ: दुपारी दीड वाजेची... ठिकाण: आयडीबीआय बॅँक, एमजीरोड... जीन्स, शर्ट घातलेला व्यक्ती थेट बॅँकेत घुसतो व महिला ...
नाशिक : वेळ: दुपारी दीड वाजेची... ठिकाण: आयडीबीआय बॅँक, एमजीरोड... जीन्स, शर्ट घातलेला व्यक्ती थेट बॅँकेत घुसतो व महिला व्यवथापकाच्या गळ्याभोवती चाकू लावत दुसºया हाताने गळा आवळून धरतो अन् म्हणतो ‘मला जगण्यासाठी १० लाख रुपये द्या....’ काही वेळेतच बॅँकेत पोलीस दाखल होतात . चाकू लावून पैसे उकळणा-या व्यक्तीला ताब्यात घेतात.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी (दि.७) नियमितपणे बॅँका सुरु असताना एमजीरोडवरील बॅँकेत एक पिवळा शर्ट व जीन्स घालेला व तोंडावर मास्क लावलेला व्यक्ती ग्राहक म्हणून येतो. येथील सर्व्हीस आॅपरेशन व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेल्या तृप्ती अग्रवाल (४०,रा.सिरीन मेडोज, गंगापूररोड) यांच्या थेट खुर्चीजवळ येऊन तो व्यक्ती थर्ड पार्टी पेमेंटच्या पध्दतीबाबत विचारु लागला. यावेळी त्यांनी त्यास खूर्चीपासून लांब उभे राहण्यास सांगितले. यानंतर ही व्यक्ती बॅँकेतून निघून गेली; मात्र पुन्हा काही मिनिटांत माघारी फिरली आणि थेट अग्रवाल यांच्या खुर्चीजवळ जात त्यांची मान एका हाताने आवळत दूस-या हाताने चाकू काढत गळ्याभोवती लावला. हा सगळा प्रकार बघून त्यांनी मदतीसाठी आरडाओरड करताच बॅँकेतील अन्य सहकारी त्यांच्या मदतीसाठी धावले असता चाकूधारी व्यक्ती अधिक आक्रमक झाली. यावेळी सेल्स विभागातील भामरे नावाच्या कर्मचा-याने त्या चाकूधारी व्यक्तीसोबत बोलण्यास सुरुवात केली असता तो म्हणाला ‘मला जगण्यासाठी १० लाख रुपये पाहिजे, पैसे काढून द्या...’ यावेळी सर्व कर्मचारी जोरजोराने अग्रवाल यांना सोडण्याची मागणी करत असतानाही तो चाकूधारी व्यक्ती त्यांची आवळलेली मान सोेडण्यास तयार नव्हता. दरम्यान, बॅँकेचे विभागीय अधिकारी यांनी स्वत: त्याची मागणी पुर्ण करणार असल्याचे सांगितले आणि अग्रवाल यांना सोडून देण्याचा आग्रह धरला. यावेळी त्या चाकूधारी व्यक्तीचा विश्वास बसल्याने त्याने त्यांच्या मानेवर लावलेला चाकू बाजूला करत त्यांना सोडले. यावेळी अन्य पुरुष सहकाऱ्यांनी त्यास विश्वासात घेत पैसे देऊ असे सांगत समजूत काढण्याचा प्रयत्न केला व यावेळी त्याची ओळख जाणून घेतली असता त्याने ‘मला जगायचे आहे, पैसे द्या’ असा तगादा लावत स्वत:चे नाव अमर अशोक बोराडे (रा.तारवालानगर) असे सांगितले. तोपर्यंत बॅँकेत पोलीस दाखल झाले आणि बोराडे यास पोलिसांनी ताब्यात घेतले. अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सरकारवाडा पोलीस ठाण्यात चाकूधारी बोराडेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.