घरातून दोन तोळ्याचा सोन्याचा हार लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 11:16 PM2020-09-12T23:16:37+5:302020-09-13T00:22:35+5:30
नाशिकरोड : जयभवानीरोड फर्नांडिसवाडी येथे एका अनोळखी इसमाने महिलेच्या घरी जाऊन ‘तुमचे कर्ज प्रकरण मंजूर झाले आहे’ असे सांगून विश्वास संपादन करत दोन तोळे वजनाचा सुमारे ७० हजारांचा सोन्याचा हार ताब्यात घेत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
नाशिकरोड : जयभवानीरोड फर्नांडिसवाडी येथे एका अनोळखी इसमाने महिलेच्या घरी जाऊन ‘तुमचे कर्ज प्रकरण मंजूर झाले आहे’ असे सांगून विश्वास संपादन करत दोन तोळे वजनाचा सुमारे ७० हजारांचा सोन्याचा हार ताब्यात घेत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
फर्नांडिसवाडीतील अलमास इक्बाल शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, शुक्र वारी (दि.११) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्या घरी एकट्या असताना एक अनोळखी इसम आला. इक्बाल शेख येथेच राहतात का, अशी विचारणा केली. अलमास यांनी पती कामावर गेल्याचे सांगितले. अनोळखी व्यक्तीने अलमास यांच्याकडून इकबाल यांचा फोन नंबर घेत इकबाल यांना फोन लावून बोलण्याचा बहाणा केला. ‘तुमचे कर्जप्रकरण मंजूर झाले आहे, त्यासाठी तारण म्हणून सोन्याची वस्तू दाखवावी लागेल. सोबत मॅडम आल्या आहेत. त्या सोन्याची वस्तू बघून कर्जाचा चेक देतील,’ असा त्याने बनावट संवाद साधला. त्या इसमाने आपले नाव जावेद शेख असल्याचे सांगितले. अलमास यांना तुमच्या पतीसोबत बोलणे झाले असल्याचे त्याने सांगितले. घरात सोन्याची वस्तू नसल्याचे अलमास यांनी सांगितल्यावर तो अनोळखी इसम म्हणाला की, तुमचे पती इकबाल यांनी सांगितले आहे की, घरी सोन्याचा हार आहे, तो द्यावा अलमास यांनी विश्वास ठेवून इसमाला दोन तोळ्याचा सोन्याचा हार दिला. तीन कप चहा ठेवा मी मॅडमला घेऊन येतो असे सांगून इसम बाहेर गेला. अलमास त्याच्यामागे पळाल्या. तथापि, तो इसम मोटरसायकलवर बसून फरार झाला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.