दोन दिवसांनी मिळणार होता डिस्चार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:15 AM2021-05-21T04:15:51+5:302021-05-21T04:15:51+5:30
खालावलेली ऑक्सिजन लेवल वाढल्याने दोन दिवसात प्रवीण यांना डिस्चार्ज मिळून ते घरी परतणार होते. त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना त्यांच्या ...
खालावलेली ऑक्सिजन लेवल वाढल्याने दोन दिवसात प्रवीण यांना डिस्चार्ज मिळून ते घरी परतणार होते. त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना त्यांच्या परतण्याची प्रतीक्षा होती; प्रवीण घरी येणार म्हणून त्यांची सर्व व्यवस्था करण्यात आली होती, मात्र नियतीने त्यांचा आनंद हिरावून घेतला आणि प्रवीण दूरच्या प्रवासाला निघून गेले. अर्ध्यावरती संसार निघून गेल्याने त्यांच्या त्यांच्या सुखी जीवनाची कहाणी अधुरीच राहीली. प्रचंड महत्त्वाकांक्षी, नवी मेहनती असलेल्या प्रवीण यांच्यावरच संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती. घरी पत्नी आणि मागे आई-वडील असल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. रंगवलेली स्वप्न आणि सुखाचे दिवस या केवळ आता आठवणीतच राहिले आहेत. महाले कुटुंबीय या दुःखातून अद्यापही सावरलेले नाहीत. आठवणींच्या कोलाहलात त्यांचा एक दिवस निघत आहे. घरातील सदस्य एकमेकाला धीर देताना स्वतःचे अश्रूंना समजावून सांगत आहेत. नियतीच्या या क्रूर खेळात विस्कटलेला संसार सांभाळण्याची जबाबदारी आता पत्नीवर आली आहे. आता तर त्यांना नोकरी शोधण्यापासून घर सावरण्यापर्यंत मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. तसूभरही दुःख कमी न होता आता नव्या उमेदीने उभे राहावे तर कशाच्या भरवशावर. कुटुंबाचा आधार गेल्याने त्यांची उणीव कायम राहणार असल्याची भावना त्यांच्या पत्नीने व्यक्त केली.
खरं म्हणजे परत येणार सर्व काही सुरळीत होणार या आशेने सारे कुटुंबीय प्रवीणच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. इतका मोठा आघात होईल आणि क्षणात सर्व स्वप्न उद्ध्वस्त होईल, असे कुणालाही वाटले नव्हते. मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर आल्यानंतरही नियतीने असा क्रूर घाला करावा या विचाराने महाले कुटुंबीय आजही सुन्न होतात.