युती-आघाडीच्या तळ्यात मळ्यातने वाढविली उमेदवारांची डोकेदुखी
By admin | Published: October 20, 2016 01:39 AM2016-10-20T01:39:12+5:302016-10-20T01:41:23+5:30
नाशिक पदवीधर निवडणूक : रणधुमाळी सुरू
नाशिक : डिसेंबरमध्ये मुदत संपत असलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपाची युती आणि कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी याबाबत ठोस निर्णय होत नसल्याने भाजपा आणि कॉँग्रेस उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. दोन्ही बाजूने युती आणि आघाडी होण्याची अपेक्षा उमेदवारांना आहे. तसे झाल्यास हा सामना तिरंगी होण्याची चिन्हे आहेत.
नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी भाजपाच्या वतीने डॉ. प्रशांत पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर कॉँग्रेसच्या वतीने विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. राज्यभरातील ११ जागांसाठी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये आघाडी करण्याचे घोडे अडले आहेत. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांच्या मुंबईत बैठका होऊनही अद्याप आघाडीचा निर्णय झालेला नाही. त्यातच दिल्लीला कॉँग्रेसच्या हायकमांडच्या बैठकीतही आघाडीबाबत नकारात्मक सूर असल्याचे समजते.
तिकडे ठाण्यात विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांच्यासाठी भाजपाकडून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या प्रचारात उतरले होते. त्याची भरपाई म्हणून नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेनेने भाजपाला मदत करावी, असा भाजपाचा आग्रह आहे;
मात्र नुकत्याच झालेल्या
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना कार्यकारी प्रमुख
उद्धव ठाकरे यांनी युती करायची
तर सन्मानाने करा, आम्ही कटोरे घेऊन फिरणार नाही, असा इशारा दिल्याने भाजपासोबत युती होते की नाही? याबाबत चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी)