बेशिस्त वाहनचालकांमुळे डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 06:46 PM2020-12-18T18:46:15+5:302020-12-19T00:58:03+5:30
मालेगाव कॅम्प : मालेगावी वाहतूक नियंत्रण करण्यासाठी शहराच्या मुख्य भागात सिग्नल यंत्रणा सुरू झाली असून, शहरवासीयांत त्याबाबत कुतूहल निर्माण झाले; चोहोबाजूंनी सिग्नल असूनदेखील वाहतूक नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलिसांची दमछाक होताना दिसून येत आहे.
सदर यंत्रणा सुरू झाल्यानंतर येथे पूर्वीपेक्षा जादा पोलीस तैनात करावे लागत आहेत. मालेगावी अनेक वर्षांपासून शहरातील मुख्य भागांमध्ये वाहतूक नियंत्रण करण्यासाठी वाहतूक सिग्नल उभारण्याची शहरवासीयांची मागणी होती. मनपाचे स्वीकृत सदस्य गिरीष बोरसे यांच्या निधीतून प्रथम मोसमपूल भागात महात्मा जोतिबा फुले पुतळा परिसरातील जोडणाऱ्या चार-पाच मुख्य रस्त्यांवर सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. सिग्नल यंत्रणा सुरू झाल्यावर येथील वाहतूक पोलिसांचा कामांचा ताण कमी होईल, अशी कल्पना सर्वसामान्यांची होती; परंतु या ठिकाणांवर वेगळे चित्र दिसून येत आहे. सकाळ, दुपार या दोन सत्रात सिग्नल यंत्रणा सुरू आहे. त्या दरम्यान काही रस्ते वाहतूक बंद तर काही रस्त्यांवर वाहतूक सिग्नलनुसार सुरू असते. त्यावेळेस थांबलेली असंख्य वाहने दुसरा सिग्नल सुरू होईपर्यंत थोपवून धरण्याचे काम वाहतूक पोलिसांना करावे लागते. समोर खांबावर येण्या-जाण्याची वेळ दिसत असते, तरी काही वाहनचालक जोरजोराने हॉर्न वाजवणे, सफेद झेब्रा पट्ट्यांवर वाहने येऊन उभे करणे, गर्दी करीत दुसऱ्या वाहनांना धक्का देणे व येथून वेगवेगळ्या मार्गावर जाण्यासाठी निश्चित जागेवर येण्याची घाई डोकेदुखी ठरत आहे.
सिग्नलवर जादा कुमक
मोठ्या शहरांप्रमाणे सिग्नल ठिकाणांवर वाहतूक पोलिसांची जास्त गरज नसते, अथवा गरजेप्रमाणे पोलीस तैनात असतात; परंतु मालेगावी सिग्नल यंत्रणा नसताना त्यावेळेच्या पोलिसांच्या संख्येपेक्षा जादा संख्येने पोलीस व त्यांच्या मदतीला होमगार्ड तैनात केले आहेत. त्यामुळे हा शहरात चर्चेचा विषय झाला आहे. अनेक वाहनचालक पाच-दहा सेकंद असताना वाहने सुसाट वेगाने धावण्यास सुरुवात करतात. त्यामुळे या पोलिसांची धावपळ होते व त्या वाहनचालकांना थांबवून तंबी द्यावी लागते, असे प्रकार दिवसभरात अनेकदा होतात तर वाहतूक नियंत्रण करताना तासन्तास वाहतूक पोलीस उन्हातान्हात उभे ठाकलेले असतात.