हेडफोन खरेदीच्या बहाण्याने आले; महिला दुकानदाराची सोनसाखळी हिसकावून गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 04:18 PM2019-10-13T16:18:47+5:302019-10-13T16:33:03+5:30
पंधरवड्यात तीन महिलांना आपले मंगळसुत्र गमवावे लागल्याने पोलिसांच्या कारभाराविषयीदेखील शंका घेतली जात आहे.
नाशिक : इंदिरानगरसह म्हसरूळ, पंचवटी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळी चोरट्यांनी चोऱ्याचा धडाका लावल्याने जणू चोरट्यांनी पोलिसांना थेट ‘ओपन चॅलेंज’ केले आहे की काय? अशी चर्चा परिसरात होऊ लागली आहे. म्हसरूळ परिसरात सोनसाखळी चोरीचे सत्र सातत्याने सुरू आहे. पंधरवड्यात तीन महिलांना आपले मंगळसुत्र गमवावे लागल्याने पोलिसांच्या कारभाराविषयीदेखील शंका घेतली जात आहे. हेडफोन खरेदीचा बहाणा करत दुकानात येऊन महिला दुकानदाराच्या गळ्याला हिसका देत सोनसाखळी ओरबाडल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पंवचटी पोलीस ठाण्याचे विभाजन करून म्हसरूळला स्वतंत्र पोलीस ठाणे स्थापन केले गेले. कारण त्या भागात वाढती लोकसंख्या नवनवीन कॉलन्यांच्या परिसरात गुन्हेगारीची पाळेमुळे घट्ट होऊ लागली होती. स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण झाल्यानंतर म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारी संपुष्टात येईल, अशी आशा व्यक्त केली जात होती; मात्र या भागात गुन्हेगारी अधिकच फोफावल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. ऐन निवडणूक आचारसंहिता व सणासुदीच्या काळात सोनसाखळीचोर सर्रासपणे महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून पळ काढताना दिसत आहेत.
म्हसरूळ येथे राहणा-या मीना नवनीतलाल त्रिवेदी यांचे म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या इमारतीपासून हाकेच्या अंतरावर दुकान आहे. काल सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दोघे इसम एका काळया रंगाच्या दुचाकीवरून दुकानासमोर आले. त्यातील एकाने दुकानात येऊन हेडफोन खरेदी करण्याचा बहाणा करत त्रिवेदी यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोनसाखळी बळजबरीने ओरबाडून पळ काढला. याघटनेवरून सोनसाखळी चोरांचे धाडस सहज लक्षात येते. यावरून पोलिसांचे परिसरात कशाप्रकारे वचक आहे, याचाही अंदाज लावता येणे शक्य आहे.
पोलीस ठाण्याचे गस्तीपथक कुणीकडे
म्हसरूळ पोलीस ठाण्याचे गस्तीपथक, गुन्हे शोध पथक नेमके कुठे अन् काय करीत आहेत? असा सवाल परिसरातील महिलावर्गाकडून उपस्थित केला जात आहे. चोरटे घरे, दुकानांच्या उंबºयावर येऊन सोनसाखळ्या हिसकावून पळ काढू लागल्याने महिलांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे. महिलांनी घराबाहेर पडू नये की काय? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
हिरावाडीत सोनसाखळी चोरी
शतपावलीसाठी बाहेर आलेल्या सुनंदा हरी अंबेकर (५३) यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी हिसकावून पळ काढल्याची घटना शनिवारी (दि.१२) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास हिरावाडी रोडवरील विधतेनगर परिसरात घडली आहे.