बरे झाले ‘कर्ण’ टोचले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:19 AM2021-09-07T04:19:00+5:302021-09-07T04:19:00+5:30
मात्र, शनिवारी झालेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘जनस्थान’ पुरस्काराच्या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी मराठीची शासन दरबारी असलेली अवस्था, ...
मात्र, शनिवारी झालेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘जनस्थान’ पुरस्काराच्या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी मराठीची शासन दरबारी असलेली अवस्था, राजकारण्यांच्या केवळ बोलण्यात असलेली पोटतिडीक, सरकारी बाबूंमधील अनास्था या सर्व बाबींवर परखड तरीही साहित्यिकीय सौम्य शब्दांत भाष्य केले. ओरिसा आणि मणिपूरसारख्या राज्यांची भवने मुंबईत, नवी मुंबईत आहेत. पण मराठी भवन नाही. इतकं स्पष्टपणे सांगतानाच राज्यातील २४ संस्थांनी मिळून मुंबईत मागील सरकारच्या काळात आंदोलन केल्यावर कुठे सर्व शाळांमध्ये मराठी सक्तीची हा निर्णय झाल्याचे कर्णिक यांनी सांगितले. मात्र, हे सांगतानाच कुसुमाग्रज प्रतिष्ठानसारख्या महाराष्ट्रातील सर्वोच्च संस्थेनेदेखील मराठी भाषेसाठी शासन दरबारी शब्दाचे वजन वापरावे. तसेच प्रतिष्ठानने प्रत्यक्ष चळवळीत सक्रिय होऊन योगदान देण्याची गरज निर्माण झाली असल्याचे सांगत प्रतिष्ठानलादेखील मराठीच्या भल्यासाठी आता मैदानात उतरण्याचे आवाहन केले. ज्या शासनात माहिती अधिकारी म्हणून काम केले, ज्या संस्थेत अध्यक्ष म्हणून काम केले, त्यांचे कान टोचावेसे कर्णिकांना वाटले असेल तर त्याबाबत वरिष्ठ स्तरावरून खरोखरच गांभिर्याने विचार करण्याची आणि कार्यप्रवण होऊन मराठी भाषेला पुनर्वैभवाप्रती नेण्याची वेळ निश्चितच आली आहे.
इन्फो !
अशी घुसखोरी रोखा
मराठी भाषेतील ‘ज्ञानपीठ’ असे जनस्थान पुरस्काराला मानले जाते. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतरच विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे यांच्यासारख्या महान साहित्यिकांना ज्ञानपीठ मिळाल्याचा इतिहास आहे. त्यामुळे हा पुरस्कार स्वीकारणारा आणि प्रदान करणारे हातदेखील तितकेच महान असतात, अशी या पुरस्काराची परंपरा आहे. मात्र, शनिवारी झालेल्या सोहळ्यात नुकत्याच झालेल्या एका विश्वस्ताने जनस्थान सन्मानाची ट्रॉफी अध्यक्षांच्या हाती सुपुर्द केल्यानंतर व्यासपीठावरून मागे हटणे अपेक्षित असताना त्या विश्वस्ताने अध्यक्षांबरोबर जणू आपणच ‘जनस्थान’ प्रदान करीत असल्याचा अविर्भाव दाखवला. स्मारक समितीचे अध्यक्ष हेमंत टकले यांच्यासारखे दिग्गज स्टेजवर असतानाही त्यांनी पुरस्कार प्रदान करताना बाजूला केवळ उभे राहण्याची परंपरा कायम राखली. मात्र, हे नूतन विश्वस्त पार पुरस्कार प्रदान करूनच बाजूला झाले. ती ट्रॉफी जड असली तरी दोन मान्यवरांना ती सहज हातात धरता येऊ शकते, हे भान ठेवून संबंधिताने मागे फिरायला हवे होते. पण तसे न करता संधीचा फायदा घेत पुरस्कार प्रदानात झालेला घुसखोरीचा प्रयत्न निदान भविष्यात तरी पुन्हा घडू न देण्याची दक्षता बाळगायला हवी.