विद्यार्थिनींना आरोग्यासह सुरक्षिततेचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 10:53 PM2019-12-14T22:53:50+5:302019-12-15T01:01:22+5:30
मालेगाव येथील पोलीस नियंत्रण कक्ष आवारातील सुसंवाद सभागृहात आरोग्य मंत्र, किशोरी संवाद आणि महिला जागरुकता यविषयी चर्चासत्र घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. आरती सिंह या होत्या.
मालेगाव : येथील पोलीस नियंत्रण कक्ष आवारातील सुसंवाद सभागृहात आरोग्य मंत्र, किशोरी संवाद आणि महिला जागरुकता यविषयी चर्चासत्र घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. आरती सिंह या होत्या.
चर्चासत्रात डॉ. रश्मी सोमाणी यांनी निरोगी आरोग्यासाठीचे नियोजन विशद केले. शारीरिक बदल, फलहार कसा घ्यावा, पाणी कसे प्यावे तसेच मोबाइलचा वापर याविषयी त्यांनी सूचना दिल्या. डॉ. हेमांगी वाव्हळ यांनी स्रियांच्या समस्या आणि स्वच्छतेअभावी होणाऱ्या आजारांची माहिती दिली. तर आजारांपासून दूर राहण्यासाठी घ्यावयाची काळजी डॉ. जोहरा मखदुमी यांनी समजावून सांगितली. यावेळी भारतीय दंड विधान, महिलांसंबंधीचे कायदे आणि अन्यायाविरोधात न्याय कसा मागावा, तक्रार कशी करावी याबद्दल डॉ. एम. डी. कांबळे यांनी मार्गदर्शन करून विद्यार्थिनींना सक्षम व सुरक्षित राहण्याचा संदेश दिला. राजस्थानमधील भवरीदेवी घटनेचे उदाहरण देत अन्यायाविरोधात सक्षम लढा देण्याचा सल्ला न्यायाधीश ए. एम. तामणे यांनी दिला. विशाखा समिती स्थापनेविषयी माहिती देण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी आणि वेळेचे नियोजन यावर मार्गदर्शन केले. सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक कल्पेश दाभाडे यांनी माहिती दिली.
कायद्याची गुन्ह्यांचे दाखले देऊन मोबाइलद्वारे घडणारे गुन्हे व सुरक्षितता याबद्दल प्रबोधन केले. अध्यक्षीय भाषणात जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. आरती सिंह यांनी स्वरक्षणाची काळजी, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आणि मोबाइलचा वापर या मुद्द्यांच्या आधारे मार्गदर्शन केले. आरोग्य, शिक्षण, करिअर, सायबर क्राइम व महिला सुरक्षाविषयक कायदे या मुद्द्यांच्या आधारे तज्ज्ञांनी विद्यार्थिनींचे प्रबोधन करीत आत्मविश्वास वाढविला. या चर्चासत्राला एटीटी हायस्कूल, जेएटी हायस्कूल, मसगा महाविद्यालय, काकाणी महाविद्यालय, मराठा महाविद्यालय, वर्धमान, शहर महाविद्यालय, समता महाविद्यालयातील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.