सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
By admin | Published: August 4, 2015 12:18 AM2015-08-04T00:18:48+5:302015-08-04T00:26:41+5:30
प्रलंबित मागण्यांसाठी १० आॅगस्टला निदर्शने
सिडको : शहराच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करणाऱ्या महानगरपालिकेच्या सिडकोतील सफाई कर्मचाऱ्यांना गेल्या तीन ते चार वर्षांपासून गणवेश तसेच इतर साहित्य पुरविण्यात आलेले नाही. यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत मनपा आयुक्तांना सांगूनही प्रश्न मार्गी लागला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे .
कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयात सीटू संलग्न कामगार संघटनेच्या वतीने बैठक घेण्यात आली. या बैठकीस नगरसेवक तानाजी जायभावे यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यात सफाई तसेच इतर विभागात काम कारणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत पाठपुरावा करूनही त्यांच्या मागण्या मान्य होत नसल्याची खंत जायभावे यांनी व्यक्त कली.
सफाई कर्मचाऱ्यांची नियमित आरोग्या तपासणी करण्यात यावी, त्यांना गणवेश तसेच इतर साहित्य मनपाकडून उपलब्ध होत नसल्याबाबत चर्चा झाली. यावेळी झालेल्या बैठकीत आरोग्य, विद्युत, बांधकाम यांसह इतर विभागांचे कर्मचाऱ्यांनीही मनपाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.
बैठकीस रावसाहेब रूपवते, जगदीश देशमुख, कल्पना शिंदे, दीपक लांडगे, राजेश ठाकूर यांसह मनपा कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)