आरोग्य केंद्रात ७२ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त
By श्याम बागुल | Published: July 17, 2019 02:41 PM2019-07-17T14:41:03+5:302019-07-17T14:47:47+5:30
जिल्ह्यातील आठ तालुके आदिवासी व पेसांतर्गंत येत असल्यामुळे शासनाच्या आदेशानुसार पेसा क्षेत्रातील आरोग्याची रिक्तपदे शंभर टक्के भरण्याच्या सुचना आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने पेसाक्षेत्रात आरोग्य व्यवस्था सज्ज ठेवली असली तरी,
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी ७२ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून, त्यातही बारा प्राथमिक आरोग्य केंद्रे विना वैद्यकीय अधिकाºयांची असल्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाला अशा आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी दररोज कसरत करावी लागत आहे. उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाचा विचार करता, आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देतांना एकमेकांची मनधरणी करण्याची वेळ विभागावर आली आहे.
जिल्ह्यातील आठ तालुके आदिवासी व पेसांतर्गंत येत असल्यामुळे शासनाच्या आदेशानुसार पेसा क्षेत्रातील आरोग्याची रिक्तपदे शंभर टक्के भरण्याच्या सुचना आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने पेसाक्षेत्रात आरोग्य व्यवस्था सज्ज ठेवली असली तरी, दुसरीकडे पेसा क्षेत्रातील रिक्त जागा शंभर टक्के भरल्यामुळे बिगर आदिवासी तालुक्यातील वैद्यकीय अधिकाºयांची संख्या कमी झाली आहे. सध्या पावसाळा सुरू असून, अशा परिस्थितीत साथीच्या रोगांची लागण होण्याची अधिक शक्यता असल्याने आरोग्य विभागाला अधिक सजगपणे कामकाज करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात जिल्हा आरोग्य अधिका-याचेच पद रिक्त असल्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्याची व्यवस्था कशी असेल याचा विचारच केलेला बरा असे म्हणण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व आरोग्य केंद्रांसाठी २४८ वैद्यकीय अधिका-यांची पदे मंजुर असताना प्रत्यक्षात मात्र निम्म्याहून अधिक जागा आजही रिक्त आहेत. सुमारे ७२ पदे रिक्त असल्यामुळे आरोग्य केंद्रे चालवितांन आरोग्य विभागाची तारेवरची कसरत करावी लागत आहे. यापुर्वी सदरची पदे भरण्यासाठी दोन वेळा प्रयत्न करूनही ती भरती वादात सापडल्यामुळे संपुर्ण प्रक्रियाच रद्द करावी लागली आहे. अशा परिस्थितीत आहे त्या मनुष्यबळावर आरोग्य केंद्र चालवितांना प्रशासनाची दमछाक होत असताना दुसरीकडे प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाºयांवर कामकाजाचा अतिरीक्त ताण पडून त्यांचे रजेवर जाण्याचे प्रमाण वाढले आहे तर काहींनी थेट राजीनामा देण्याची तयारी दर्शविल्यामुळे आरोग्य विभागाची अवस्था बिकट झाली आहे. सुत्रांच्या म्हणण्यानुसार जिल्ह्यातील बारा आरोग्य केंद्रांवर गेल्या काही महिन्यांपासून वैद्यकीय अधिकारीच नसल्यामुळे अशा आरोग्य केंद्रांवर नजिकच्या केंद्रातून दररोज वैद्यकीय अधिकाºयांची सोय करावी लागत आहे. त्यासाठी प्रसंगी अधिकाºयांची मनधरणी करावी लागत असून, अशीच परिस्थिती खुद्द आरोग्य विभागाची जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात निर्माण झाली आहे. तेथेही बहुतांशी पदे रिक्त असल्यामुळे आहे त्या कर्मचाºयांकडून काम करून घेतांना कामाचा अतिरीक्त ताण द्यावा लागत आहे.