आरोग्य केंद्रांच्या कंत्राटी वाहनचालकांचे रखडले वेतन उपोषणाचा इशारा : जुलैपासून विनावेतन
By admin | Published: December 9, 2014 01:27 AM2014-12-09T01:27:36+5:302014-12-09T01:28:20+5:30
आरोग्य केंद्रांच्या कंत्राटी वाहनचालकांचे रखडले वेतन उपोषणाचा इशारा : जुलैपासून विनावेतन
नाशिक : जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या जिल्'ातील १०३ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी ७० प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रुग्णवाहिकेवरील वाहनचालकांचे जुलैपासून वेतन नसल्याने या वाहनचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. येत्या आठवडाभरात वेतन न झाल्यास या वाहनचालकांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या वाहनचालकांच्या एका शिष्टमंडळाने समाजकल्याण सभापती उषा बच्छाव यांची भेट घेऊन त्यांच्याकडे कैफियत मांडली. जिल्हाभरातील ७० वाहनचालकांचे जुलैपासूनचे वेतन रखडले आहे. गेल्या पाच वर्षांपासून हे वाहनचालक कंत्राटी स्वरूपात जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रुग्णवाहिकांवर कार्यरत आहेत. त्यापैकी ३५ कंत्राटी वाहनचालक बिवीजी या खासगी संस्थेचे, तर ३५ वाहनचालक लोकसेवा या खासगी संस्थेमार्फत कंत्राटी स्वरूपात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सेवेत आहेत. या संस्थांनी या वाहनचालकांंना वेतन देण्यास असमर्थता दर्शविली असून, जिल्हा परिषदेकडूनच निधी उपलब्ध होत नसल्याने वेतन देता येत नाही,असे या संस्थांचे म्हणणे आहे, तर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानेही या कंत्राटी वाहनचालकांना वाऱ्यावर सोडले असून केंद्र स्तरावरून निधी आला तरच तुमचे वेतन होऊ शकते. पुन्हा चकरा मारू नका आणि प्रसार माध्यमांकडे जाल तर याद राखा, तुमची सेवाच खंडित करण्यात येईल,असे दम भरल्याने या वाहनचालकांना तोंड दाबून बुक्याचा मार खावा लागत आहे. आमचे वेतन वेळेत झाले नाही तर नाईलाजास्तवर आम्हाला आमरण उपोषण करावे लागेल अन् आम्ही उपोषणाला बसलो तर प्राथमिक आरोग्य केंद्रांतील रुग्णसेवा खंडित होऊ शकते, त्यामुळे याविषयी आरोग्य विभाग व प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन या कंत्राटी वाहनचालकांनी केले आहे. (प्रतिनिधी)