त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आरोग्य केद्रांचे आरोग्यमंत्र्यांना गाऱ्हाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2021 10:55 PM2021-10-19T22:55:08+5:302021-10-19T22:55:32+5:30
वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बराचसा भाग दुर्गम आणि अतिदुर्गम असल्याने आरोग्याच्या समस्या दिवसागणिक वाढत आहेत. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्राचा सीमापरीघ व्यापक असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवा बजाविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यात कोरोनासारख्या महामारीच्या आजाराने डोके वर काढले असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रांना तितकेच महत्त्व प्राप्त झाले आहे
वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बराचसा भाग दुर्गम आणि अतिदुर्गम असल्याने आरोग्याच्या समस्या दिवसागणिक वाढत आहेत. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्राचा सीमापरीघ व्यापक असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवा बजाविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यात कोरोनासारख्या महामारीच्या आजाराने डोके वर काढले असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रांना तितकेच महत्त्व प्राप्त झाले आहे.
त्यात शासकीय योजनांमधील लाभार्थ्यांसह स्तनदा माता, गरोदर माता, विविध वयोगटांतील बालक तसेच डिलिव्हरी व उपचार घेणाऱ्या रुग्णाचा ग्रामीण भागातही आरोग्य केंद्र, उपकेंद्राकडे ओढा दिसून येत आहे. परंतु कधी काळी रुग्णवाहिकेविना मुकण्याची वेळ रुग्णांवर येत असल्याने अंजनेरी, हरसूल, ठाणापाडा गटातील प्राथमिक आरोग्य केंद्राना नवीन रुग्णवाहिका मिळावी, तसेच आरोग्य केंद्रातील रिक्तपदे तत्काळ भरावीत आदी मागण्यांचे निवेदन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना नाशिक येथील भेटीप्रसंगी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने दिले.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांच्या होणाऱ्या गैरसोयीचा विचार करण्यात यावा, यासाठी नवीन रुग्णवाहिका देण्यात याव्यात तसेच आरोग्य केंद्रात पूर्ण कर्मचारी पदे भरलेली नाहीत, सद्यस्थितीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे लवकरात लवकर भरावी अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बहिरू मुळाणे, जिल्हा नेते अरुण मेढे, सामाजिक कार्यकर्त्या भारती भोये, रवींद्र भोये, मुक्तार शेख आदींसह त्र्यंबकेश्वर तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.