दोन दिवसांत आठ हजार नागरिकांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 12:02 AM2020-04-09T00:02:27+5:302020-04-09T00:03:59+5:30
गोविंदनगर भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य आणि वैद्यकीय विभागाने अधिक सतर्कता दाखवत गोविंदनगर परिसरातील प्रत्येक घर पिंजून काढण्यास प्रारंभ केला आहे. बाधित रुग्णाच्या घरापासून तीन किलोमीटर क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या मोहिमेत २६ आरोग्य पथकांनी दोन दिवसांत तीन हजार घरांना भेटी दिल्या असून, त्यात ७ हजार ७९० नागरिकांची आरोग्य तपासणी केली.
नाशिक : शहरातील गोविंदनगर भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य आणि वैद्यकीय विभागाने अधिक सतर्कता दाखवत गोविंदनगर परिसरातील प्रत्येक घर पिंजून काढण्यास प्रारंभ केला आहे.
बाधित रुग्णाच्या घरापासून तीन किलोमीटर क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या मोहिमेत २६ आरोग्य पथकांनी दोन दिवसांत तीन हजार घरांना भेटी दिल्या असून, त्यात ७ हजार ७९० नागरिकांची आरोग्य तपासणी केली. सुदैवाने आतापर्यंत एकही संशयित रुग्ण आढळून आलेला नाही. कोरोनाचा संसर्ग राज्यात पसरू लागल्यानंतर सुमारे पंधरा दिवसांत एकही रुग्ण नाशिकमध्ये आढळला नव्हता, मात्र आठ दिवसांपूर्वी जिल्ह्णाच्या ग्रामीण भागातून आणि नंतर गेल्या सोमवारी (दि.६) शहरातील गोविंदनगर भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली. संबंधित बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांची आरोग्य तपासणी करताना बाधित रुग्ण राहात असलेल्या घरापासूनचा तीन किलोमीटर परिसरातील भाग सील केला आहे. या परिसरातील जवळपास १० हजार घरांचीदेखील आरोग्य तपासणी करण्यासाठी २२ वैद्यकीय पथके कार्यवाही करीत आहेत. याशिवाय चार वैद्यकीय पथकामागे तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक निगराणीसाठी नियुक्त करण्यात आले आहे. या २२ पथकांनी मंगळवारी (दि. ७) १८१० घरांना भेटी देऊन ३८९५ नागरिकांची आरोग्य तपासणी केली आहे. तर बुधवारी (दि.८) १११० घरांना भेटी देऊन ३८९५ नागरिकांची आरोग्य तपासणी केली. दोन दिवसांत २९२० घरांना भेटी देऊन ७७९० नागरिकांची आरोग्य तपासणी केली आहे.
एकही संशयित नसल्याने सुटकेचा नि:श्वास
महापालिकेने सुरू केलेल्या तपासणीत परिसरातील नागरिकांनी अलीकडे देश-विदेशात प्रवास केला होता का याची माहिती घेताना घरातील कोणाला सर्दी, खोकला, ताप आहे का याची तपासणी केली जात आहे. एखाद्या घरातील कोणालाही खोकला, सर्दी किरकोळ आणि सामान्य स्थितीत असल्यास संबंधितांना औषधे दिली जातात, मात्र यापेक्षा काही गंभीर आढळल्यास रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले जात आहे. सुदैवाने दोन दिवसांत संशयित रुग्ण न आढळल्याने महापालिकेने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.