वणीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:16 AM2021-08-29T04:16:50+5:302021-08-29T04:16:50+5:30
वणी : येथील साईबाबा मंदिर परिसरालगत असलेल्या राजमाता जिजाऊनगर येथील रहिवाशांच्या इमारतींच्या दर्शनी भागात दररोज सांडपाणी येत असल्याने या ...
वणी : येथील साईबाबा मंदिर परिसरालगत असलेल्या राजमाता जिजाऊनगर येथील रहिवाशांच्या इमारतींच्या दर्शनी भागात दररोज सांडपाणी येत असल्याने या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत गटविकास अधिकारी, ग्रामविकास अधिकारी , ग्रामपालिका यांच्याकडे लेखी तक्रारी करूनही समस्या प्रलंबित राहिल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या नगरमध्ये रोहाउसेस, बंगले व अपार्टमेंट आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूस निवासस्थाने असून मागील वस्तीतील सांडपाणी नियमितपणे या रहिवाशांच्या इमारतीपुढे येते. त्यामुळे दुर्गंधी सुटते. वराहां संचार वाढलेला आहे. दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांची शक्यता बळावली असल्याची माहिती सुशांत थोरात, भरत शिरसाठ व रहिवाशांनी लेखी स्वरुपात तक्रारीच्या स्वरुपाने दिली आहे. २०१७ पासून सातत्याने दाद मागूनही समस्येचे निराकारण होत नसल्याने या भागातील नागरिक हतबल झाले आहेत. संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.