आरोग्य, स्वच्छताप्रश्नी गाजली सभा
By Admin | Published: June 30, 2017 12:32 AM2017-06-30T00:32:40+5:302017-06-30T00:33:28+5:30
नाशिकरोड : स्वच्छतेचा प्रश्न, कीटकनाशक फवारणी, बिटको रुग्णालयातील समस्या आदी विषयांवरून नाशिकरोड प्रभागाच्या पहिल्याच बैठकीत गरमागरम चर्चा झाली
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : स्वच्छतेचा प्रश्न, पावसाचे साचणारे पाणी, कीटकनाशक फवारणी, बिटको रुग्णालयातील समस्या आदी विषयांवरून नाशिकरोड प्रभागाच्या पंचवार्षिकच्या पहिल्याच बैठकीत गरमागरम चर्चा झाली.
मनपाच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर गुरुवारी नाशिकरोड प्रभागाची पहिलीच बैठक प्रभाग सभापती सुमन सातभाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीच्या प्रारंभी विषय पत्रिकेवरील सातही विषयांना प्रशासकीय व वित्तीय मंजुरी देण्यात आली.
यावेळी अस्वच्छता व ठिकठिकाणी साचणारे पावसाचे पाणी यावरून नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. देवी चौकात साचणारे पावसाचे पाणी, दत्तमंदिररोड एसटी महामंडळाच्या जागेवर टाकण्यात येणारा केरकचरा, घाण, हॉटेल व हातगाड्यावरील अन्नपदार्थ याबाबत उपाययोजना व कारवाई करण्यात येत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. अनेक ठिकाणी भूमिगत गटार योजनेचे चेंबर हे रस्त्याला समांतर नसून काही उंचीवर असल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही ते चेंबर अपघाताला आमंत्रण देत आहे. स्मशानभूमी येथील वखारीवर शेड नसल्याने लाकडे ओली होत असल्याने अंत्यसंस्कारप्रसंगी मोठी अडचण येत असल्याचे नगरसेवकांनी सांगितले.
मनपा निवडणुकीतील कामांचे कर्मचाऱ्यांची बिले प्रलंबित आहेत, सफाई-स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांना रेनकोट, गमबूट देण्यात यावे, मलेरिया विभागांचा कीटकनाशक फवारणीचा ठेका दिलेल्या कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या फवारणीचा कुठलाही फायदा होत नसून ती फवारणी फक्त देखावा ठरत असल्याचा आरोप करत नगरसेवकांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते.
बैठकीला नगरसेवक रमेश धोंगडे, प्रशांत दिवे, संतोष साळवे, संभाजी मोरूस्कर, दिनकर आढाव, पंडित आवारे, केशव पोरजे, शरद मोरे, विशाल संगमनेरे, सत्यभामा गाडेकर, कोमल मेहरोलिया, जयश्री खर्जुल, ज्योती खोले, सुनीता कोठुळे, रंजना बोराडे, सरोज अहिरे, डॉ. सीमा ताजणे, मीराबाई हांडगे, मंगला आढाव व अधिकारी उपस्थित होते.