आरोग्य : खानावळी, चहाटपऱ्यांवर कारवाईची मागणी

By admin | Published: October 31, 2014 10:41 PM2014-10-31T22:41:29+5:302014-10-31T22:41:43+5:30

उघड्यावरील उष्टावळ रोगराईला देते निमंत्रण

Health: Demand for action on nineteen and tea courts | आरोग्य : खानावळी, चहाटपऱ्यांवर कारवाईची मागणी

आरोग्य : खानावळी, चहाटपऱ्यांवर कारवाईची मागणी

Next

मालेगाव : शहर व परिसरातील विविध हॉटेल्स, खानावळ व चहाटपरी येथे अत्यंत गलिच्छ वातावरण राहत असून, तेथील उष्टावळी व केरकचरा शहरभर विविध ठिकाणी उघड्यावर पडत असल्याने शहरात रोगराई पसरत आहे. यासंदर्भात मनपा प्रशासनाने शहरात व्यापक प्रमाणात स्वच्छता मोहीम राबवावी. तसेच संबंधित हॉटेल्स - खानावळ व चहाटपऱ्यांची चौकशी करण्यात येऊन त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
मालेगाव शहर - परिसरातून रोज जवळपास आठ ते दहा लक्ष लोकसंख्येचे वास्तव्य व ये - जा सुरू असते. शहरात यंत्रमाग व्यवसायावर काम करणारे कारागीर मोठ्या संख्येने असून, त्यांच्यासाठी असलेल्या खानावळी, चहाटपरी व छोट्यामोठ्या हॉटेल्स यांची संख्या लक्षणीय आहे. शहरातील बाजारपेठा, बसस्थानक प्रमुख चौक येथेही शाकाहारीसोबत मांसाहारी हॉटेल्सची संख्या वाढलेली आहे. याशिवाय शहरातील मध्यमवर्गीय व उच्चवर्णीय जनतेसाठीही शहर परिसरात काही हॉटेल्स निर्माण झाली आहेत. यापैकी शहराच्या दाटवस्तीत जी छोटी-मोठी हॉटेल्स-खानावळी व चहाटपरी आहेत, तेथील वातावरण अत्यंत गलिच्छ स्वरूपाचे आहे. काही हॉटेल्स, खानावळी व चहाटपऱ्या या रस्त्याच्या कडेला, खुल्या गटारनाल्यावर, त्यालगत आहेत. त्यामुळे येथे दिवसरात्र माशा, डास व विविध कीटकांचा मुक्त संचार असतो. याशिवाय या हॉटेल्स - खानावळमधील विविध प्रकारची उष्टावळी व केरकचरा हा रात्री उशिरा वा भल्या सकाळी हॉटेल्सच्या परिसरातच वा मुख्यरस्त्यालगत उघड्यावर टाकला जातो. मनपा प्रशासनातर्फे मुळात शहरातील गटार नाल्यांची साफसफाई ठीक होत नाही. गटारीतून काढलेला कचरा बरेच दिवस उचलला जात नाही. त्यात या हॉटेल्स - खानावळ व चहाटपरींमधील उष्टावळी व केरकचऱ्याने अधिक भर पडते. या कचऱ्यात प्लास्टीक पिशवी, ग्लास, भांडे आदिंचा समावेश असतो.
याचा दुष्परिणाम शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्याच्या दुर्गंधीमुळे अनेकांना श्वसन व पचनसंस्थेचे आजार जडले आहे. मनपाच्या स्वच्छता निरीक्षकांचे याकडे पूर्णत: दुर्लक्ष झालेले आहे.
शहरात डेंग्यू, मलेरियासह विविध साथीच्या आजाराचे रुग्ण वर्षभर असतात. अशा अस्वच्छ परिसरामुळे त्यांना आरोग्यदायी वातावरणापासून दूर रहावे लागते. त्यामुळे
मनपा प्रशासनाने शहरात यासंबंधी व्यापक स्वच्छता मोहीम राबवावी. तसेच महाराष्ट्र राज्य प्रदूषण
मंडळाने यासंबंधी चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Web Title: Health: Demand for action on nineteen and tea courts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.