निम्मा जिल्हा कोरोनापासून वाचविण्यात आरोग्य विभागाला यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:15 AM2021-04-08T04:15:06+5:302021-04-08T04:15:06+5:30
नाशिक जिल्ह्यात सर्व प्रथम निफाड तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण गेल्या वर्षी मार्च महिन्यात सापडल्याने मोठी खळबळ उडाली. आरोग्याची ...
नाशिक जिल्ह्यात सर्व प्रथम निफाड तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण गेल्या वर्षी मार्च महिन्यात सापडल्याने मोठी खळबळ उडाली. आरोग्याची पुरेशी नसलेली साधने, रोगाविषयी अपुरी माहिती, जनतेत असलेली भीती पाहता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची कसोटी लागली होती. परंतु नियोजन, घरोघरी जाऊन केलेले सर्वेक्षण व तपासणी त्यामुळे कोरोनाची साथ रोखण्यात मदत झाली. त्यानंतर मात्र सरकारने अनलॉक जाहीर केल्याने तसेच ग्रामीण भागात शेती कामांनी वेग घेतल्याने कोरोनाने पुन्हा डोके वर काढले. असे असले तरी आरोग्य विभागाने आपले प्रयत्न सुरूच ठेवले, मात्र लग्न समारंभ, दशक्रिया विधी, बाजार समित्यामध्ये येणे-जाणे वाढल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. आज जिल्ह्यात १०५२७ इतके रुग्ण विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.
नाशिक जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता, आठ तालुके आदिवासी असून, अन्य तालुके बिगर आदिवासी आहेत. आदिवासी भागातील जनतेचा फारसा संबंध शहराशी येत नसला तरी, सिन्नर, दिंडोरी, इगतपुरी या तीन तालुक्यांचा संबंध नाशिक शहराशी निकटचा आहे, तर निफाड तालुक्याचे नाशिकशी राजकीय, सामाजिक संबंध आहेत. त्यामुळे या तालुक्यात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यातील १९१७ गावांपैकी ९७४ गावांमध्ये कोरोनाची लागण झालेली नाही.
----------
एकूण रूग्ण- १०५२७
जिल्ह्यात एकूण गावे- १९१७
९७४ गावात कोरोनाचा रूग्ण नाही
शहरी रूग्ण-२२४९०
ग्रामीण रूग्ण-१०५२७
लोकांची काेरोनावर मात-१,७२,९६७
एकूण मृत्यू-१०३३
२९ मार्च २०२०- जिल्ह्यात आढळला पहिला रूग्ण
---------------