मनमाड, नांदगाववर आरोग्य विभागाचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 06:36 PM2020-06-04T18:36:23+5:302020-06-04T18:38:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : मालेगाव व नाशिक शहरात दरदिवसाआड कोरोनाचे रुग्ण वाढत असताना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र मनमाड, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मालेगाव व नाशिक शहरात दरदिवसाआड कोरोनाचे रुग्ण वाढत असताना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र मनमाड, नांदगाव वगळता कोरोनाला अटकाव करण्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेला मोठे यश मिळाले आहे. २०८ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ७० टक्के म्हणजेच १४७ रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे, तर सध्या उपचार घेत असलेल्या ५४ रुग्णांपैकी बहुतांशी रुग्णांच्या प्रकृतीत कमालीची सुधारणा होत असल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, मनमाड, नांदगाव येथील वाढते रुग्ण पाहता, या दोन्ही गावांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, कोणत्याही परिस्थितीत नवीन रुग्ण वाढू न देण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
सरकारने लॉकडाउनमध्ये शिथिलता आणल्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ होवू लागली असून, मनमाड येथे रेल्वेस्थानकावर स्वच्छतेचे काम करणाऱ्या कर्मचाºयामुळे त्याच्याच कुटुंबातील १४ जण कोरोनाने बाधित झाले आहेत. पहिला रुग्ण सापडल्यानंतर ग्रामीण आरोग्य यंत्रणेने रुग्णाच्या कुटुंबातील २६ सदस्यांना थेट विलगीकरण कक्षात दाखल करून त्यांचे नमुने घेतले त्यातून १४ बाधित सापडले आहेत. या सर्वांवर उपचार सुरू असून, नांदगावला नऊ रुग्ण आहेत, तर ग्रामीण भागात तीन रुग्ण आहेत. मात्र जिल्ह्यातील अन्य भागांच्या तुलनेत हे प्रमाण अधिक असल्याने आरोग्य यंत्रणेने नांदगाव, मनमाड व काही प्रमाणात येवल्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या भागात १३ कन्टेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले असून, त्याचे तंतोतंत पालन करण्याबरोबरच घरोघरी जाऊन रुग्ण तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील अन्य भागांतील आशा कर्मचाऱ्यांची सेवा वर्ग करण्यात आली आहे. गुरुवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, नांदगाव, मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकाºयांशी संपर्क साधून माहिती जाणून घेतली त्याचबरोबर कन्टेन्मेंट झोनची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या. ज्या भागात रुग्ण सापडले त्या भागापलीकडे त्याचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी आरोग्य तपासणी कडक करण्याच्या सूचना दिल्या.