आरोग्य विभागाची झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 12:55 AM2017-08-24T00:55:47+5:302017-08-24T00:55:53+5:30
शहरात डेंग्यू व स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. पेस्ट कंट्रोल होत नाही. ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचलेले दिसून येतात. स्वच्छता निरीक्षक जागेवर नसतात, या समस्यांचा पाढा वाचत महापौर रंजना भानसी यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाºयांची झाडाझडती घेतली. कामात सुधारणा न झाल्यास कारवाईचा इशाराही महापौरांनी दिला.
नाशिक : शहरात डेंग्यू व स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. पेस्ट कंट्रोल होत नाही. ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचलेले दिसून येतात. स्वच्छता निरीक्षक जागेवर नसतात, या समस्यांचा पाढा वाचत महापौर रंजना भानसी यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाºयांची झाडाझडती घेतली. कामात सुधारणा न झाल्यास कारवाईचा इशाराही महापौरांनी दिला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर रंजना भानसी यांनी आरोग्य विभागाचे अधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांची बैठक घेत शहरातील आरोग्यविषयक समस्यांचा आढावा घेतला. यावेळी डॉ. राहुल गायकवाड यांनी शहरात गेल्या तीन आठवड्यात ५१ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे सांगितले. डेंग्यू नियंत्रणासाठी शहरात ६२ पथके कार्यरत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु, शहरात डेंग्यू आणि स्वाइन फ्लूच्या रुग्णांची वाढती संख्या ही चिंताजनक असल्याचे सांगत महापौरांनी त्याबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले. शहरात आरोग्य विभाग नुसता कागदोपत्री असल्याचा आरोप करत महापौरांनी अधिकारी व कर्मचाºयांची काम करण्याची मानसिकताच नसल्याचे सांगितले. धूर व औषध फवारणीवर विभागाचे नियंत्रण नाही. नगरसेवकांना फवारणीची माहिती दिली जात नाही. स्वच्छता निरीक्षकही काम करताना दिसून येत नसल्याचे महापौरांनी सांगितले. यापुढे स्वच्छता निरीक्षकांनी नगरसेवकांची भेट घेऊन माहिती द्यावी आणि त्यांच्या भेटीचे प्रमाणपत्र महापौर कार्यालयाला सादर करावे, अन्यथा त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही महापौरांनी दिला.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छतेबाबत जागरूक राहण्याचेही आदेश महापौरांनी दिले. बैठकीला उपमहापौर प्रथमेश गिते, आरोग्य समितीचे सभापती सतीश कुलकर्णी, उपसभापती योगेश शेवरे उपस्थित होते.