आरोग्य संचालकांकडून झाडाझडती ; कारवाई करण्याचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:01 AM2018-11-22T00:01:05+5:302018-11-22T00:16:41+5:30
गैरसोय, अनागोंदी व मनमानी कारभारामुळे गाजलेल्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात किडनी विकारावर उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णावर डॉक्टरांऐवजी सफाई कर्मचाऱ्यांकरवी उपचार करण्यात आल्याने त्यास जीव गमवावा लागल्याचे वृत्त दैनिक लोकमतमध्ये बुधवारी (दि़२१) प्रसिद्ध होताच राज्याचे आरोग्य संचालक डॉ़ संजीव कांबळे यांनी संदर्भ सेवा रुग्णालयास भेट दिली़
नाशिक : गैरसोय, अनागोंदी व मनमानी कारभारामुळे गाजलेल्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात किडनी विकारावर उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णावर डॉक्टरांऐवजी सफाई कर्मचाऱ्यांकरवी उपचार करण्यात आल्याने त्यास जीव गमवावा लागल्याचे वृत्त दैनिक लोकमतमध्ये बुधवारी (दि़२१) प्रसिद्ध होताच राज्याचे आरोग्य संचालक डॉ़ संजीव कांबळे यांनी संदर्भ सेवा रुग्णालयास भेट दिली़ रुग्णालयातील अनागोंदी कारभाराबाबत डॉ़ कांबळे यांनी नाराजी व्यक्त करून वैद्यकीय अधीक्षक डॉ़ राजेश कोशिरे यांची झाडाझडती घेत कामकाजात सुधारणा न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे़
आरोग्य संचालक डॉ़ कांबळे यांनी बुधवारी सकाळी साडेनऊ दहा वाजेच्या सुमारास विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयास भेट देऊन रुग्णाच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी केली़ याबरोबरच आरोग्य उपसंचालक डॉ़ रत्ना रावखंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ विजय डेकाटे यांच्या समवेत संदर्भमधील डॉक्टर, नर्स, कर्मचारी यांच्यासोबत संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या असता वैद्यकीय अधीक्षकांच्या मनमानीबाबत तक्रारी करण्यात आल्या़ नारायण लासुरे यांच्या मृत्यूस तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्याप सत्य बाहेर आलेले नाही तर दुसरीकडे सफाई कर्मचाºयांना नोटिसा पाठवून प्रशासन वेळकाढूपणा करते आहे़
संचालक डॉ़ कांबळे यांनी कर्मचाºयांकडून समस्या जाणून घेतल्यानंतर वैद्यकीय अधीक्षक कोशिरे यांना सर्वांसमक्ष तुम्ही पदभार स्वीकारल्यानंतर संदर्भमधील परिस्थिती आणखीनच बिघडली असून, कामकाजात सुधारणा न झाल्यास तुमच्यावर कारवाई करावी लागेल, अशी तंबी दिली़ यावेळी रुग्णालयातील नर्सकडून बळजबरीने खुलासा लिहून घेण्यात आल्यानंतर आरोग्य उपसंचालकाच्या कार्यालयातही डॉ़ कोशिरे यांची चांगलीच झाडाझडती घेण्यात आल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे़
डॉक्टरांची चुकीची नेमणूक
नाशिकचे विभागीय संदर्भ सेवा हे सुपरस्पेशालिटी रुग्णालय असून, या ठिकाणी हृदयरोग, यकृत व कर्करोगावर उपचार केले जातात़ मात्र, संदर्भ रुग्णालयात विभाग नसलेले व उपचारासाठी कधीही रुग्ण येत नसतानाही आर्थोपिडीशन, पिडीयाट्रिशन, नेत्ररोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ यांच्या नेमणुका करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे़ मुळात एमबीबीएस डॉक्टरांची आवश्यकता असताना संदर्भला पोस्ट नसताना काही पदे भरून ठेवण्यात आली आहेत़
वादग्रस्त कारकीर्द
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, दिंडोरी या ठिकाणी मेडिकल सुपरीटेंडेंट म्हणून कार्यरत असताना तेथील कर्मचारी व डॉक्टर, वैद्यकीय अधीक्षकांच्या विरोधात ठिय्या आंदोलन केले होते़ तसेच अधीक्षकांच्या वादग्रस्त कारकिर्दीबाबत लोकप्रतिनिधींनी विधिमंडळातही तारांकित प्रश्न उपस्थित केले होते़ संदर्भ रुग्णालयातील अधीक्षकपदाचा पदभार जूनमध्ये स्वीकारल्यापासून वातावरण बिघडल्याचे कर्मचारी सांगतात़