यात्रेच्या लोकवर्गणीतून गावासाठी आरोग्य साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:13 AM2021-05-15T04:13:39+5:302021-05-15T04:13:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नांदूरशिंगोटे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केवळ शहरी भागच नव्हे, तर ग्रामीण भागालाही तडाखा सहन करावा लागत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदूरशिंगोटे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केवळ शहरी भागच नव्हे, तर ग्रामीण भागालाही तडाखा सहन करावा लागत आहे. यामुळे या लाटेतून सावरण्यासाठी आता अनेक गावे सरसावली असून, सिन्नर तालुक्यातील मऱ्हळ खुर्द गावानेही यात्रेसाठी जमा करण्यात येणाऱ्या लोकवर्गणीतून गावासाठी आरोग्य सुविधा उभारण्याचा संकल्प केला आहे.
या संकल्पनेच्या अनुषंगाने शक्य असेल अशा ग्रामस्थांकडून लोकवर्गणी जमा केली जात आहे. या लोकवर्गणीतून गावातील प्रत्येक कुटुंबाकरिता स्टीमर, व्हिटॅमिन सी आणि मास्कचे वाटप करण्यात येणार आहे. प्रतिजेजुरी म्हणून महाराष्ट्रात ओळख असलेल्या मऱ्हळ येथील खंडेराव महाराजांचा दरवर्षी माघ पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी यात्रोत्सव साजरा केला जातो. यावर्षी कोरोनाच्या निर्बंधांमुळे यात्रा भरविण्यात आली नाही. यात्रेत तमाशा, कुस्ती आणि टांगा शर्यतीवर खर्च केला जातो. हाच खर्च यंदा आरोग्यासाठी केला तर अशी कल्पना मच्छिंद्र कुटे यांनी मांडली. त्याला माजी सरपंच रामनाथ कुटे यांनी अनुमोदन दिले. पोलीसपाटील संदीप कुटे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब बोडके आणि भगीरथ लांडगे यांच्याकडे यासाठी वर्गणी जमा केली जात आहे. यासाठी अनेकांचे मदतीचे हात लागत असून, अक्षय तृतीयेला लोकवर्गणीतून आरोग्य साहित्य खरेदी करून गावातील प्रत्येक घरात त्याचे वाटप केले जाणार असल्याची माहिती संदीप कुटे-पाटील यांनी दिली. ही लोकवर्गणी पूर्णपणे ऐच्छिक ठेवली आहे. कोरोना काळात गरजूंना मदत मिळावी, असा हेतू या संकल्पनेमागील असून, शक्य असेल त्यांनी वर्गणी जमा करावी, असे आवाहन ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.
-------------------
कोरोनाला रोखण्यासाठी शासन पूर्णपणे प्रयत्न करत आहे. परंतु, या प्रयत्नांना नागरिकांची साथ असणे गरजेचे आहे. प्रत्येक गावाने आपापल्यापरिने नियोजन आणि उपाययोजना केल्यास कोरोनाला अटकाव करणे सहज शक्य आहे. त्याच हेतूने आमचाही प्रयत्न आहे.
संदीप कुटे-पाटील, पोलीसपाटील