आरोग्य, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:15 AM2021-09-03T04:15:18+5:302021-09-03T04:15:18+5:30
सिन्नर : मनेगाव येथे ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. दोन ते अडीच तास चाललेल्या ग्रामसभेत पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांचे प्रश्न ...
सिन्नर : मनेगाव येथे ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. दोन ते अडीच तास चाललेल्या ग्रामसभेत पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांचे प्रश्न समजावून घेतले. येत्या काळामध्ये आरोग्य, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ग्रामपंचायतीची उत्पन्नवाढ आदींसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या प्रश्नांवर भर देण्याची ग्वाही सरपंच संगीता शिंदे यांनी दिली. सरपंच संगीता शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेस उपसरपंच सी.डी. भोजने, ग्रामसेवक माधव यादव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते. मागील काळात कोरोनाची परिस्थिती असल्याने मनेगावात ग्रामसभा घेण्यात आली नव्हती. मनेगाव जिल्ह्याच्या नकाशावर शिक्षण, रसवंतीगृह यासाठी प्रसिद्ध आहे. दुष्काळाच्या नावाने रडत न बसता काहीतरी वेगळे करण्याचा गावाचा इतिहास आहे. प्रत्येक घरातील एक व्यक्ती चांगल्या पदावर कार्यरत आहे. त्यामुळे दुष्काळाच्या नावाने रडत न बसता वेगवेगळ्या मार्गाने उदरनिर्वाहाची साधने निर्माण करण्यात मनेगावकरांचा हातखंडा असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे यांनी सांगितले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य, कृषी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, तलाठी, वायरमन, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.