त्र्यंबकेश्वरमधील आरोग्य धोक्यात
By admin | Published: September 26, 2015 10:40 PM2015-09-26T22:40:55+5:302015-09-26T22:41:21+5:30
त्र्यंबकेश्वरमधील आरोग्य धोक्यात
त्र्यंबकेश्वर : कुंभमेळ्यानिमित्त भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी संपूर्ण गावाच्या कानाकोपऱ्यात, गल्लीबोळात मोठ्या प्रमाणात मलमूत्र विसर्जन केल्याने त्र्यंबकवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
कुंभमेळा वर्षभर असल्याने भाविकांचा ओघ सुरूच राहणार आहे. होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने मोठ्या प्रमाणात स्वच्छतागृह उभारले मात्र लोकांना त्याबद्दल केलेले मार्गदर्शन कमी पडल्याने, त्यांची उभारणी दूर अंतरावर असल्याने भाविकांनी त्या स्वच्छतागृहांकडे, शौचालयांकडे पाठ फिरवल्याचेच चित्र आहे. सोमवार (दि. २७) पासून लवकरच पितृपक्ष सुरू होत असल्याने भाविकांची गर्दी आता रोजच सुरू राहणार असल्याने आरोग्य विभागाने हा प्रश्न आताच मार्गी लावला, व्यापक प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविली आणि वरुणदेवाची कृपा होऊन एक-दोन दिवस तरी मुसळधार पाऊस झाला तरच ही घाण, कचरा वाहून जाऊ शकेल आणि रोगराई आटोक्यात येऊ शकेल. आरोग्य विभागाने त्वरित संपूर्ण गावात रोग प्रतिबंधक औषधांची फवारणी करणे अत्यंत गरजेचे बनले आहे. हे पाऊल तत्काळ उचलले गेले नाही, तर भाविकांसह येथील स्थानिकांनी एखादी साथ पसरल्यास जबर किंमत मोजावी लागणार आहे. स्वच्छता मोहीम राबविली जावी आणि त्यात भाविकांचा, स्थानिकांचाही सहभाग करून घ्यावा तरच येथील आरोग्य नियंत्रणात राहू शकेल, असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे.