आरोग्य क्षेत्र आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:16 AM2020-12-31T04:16:09+5:302020-12-31T04:16:09+5:30
वर्षाच्या प्रारंभापासून जिल्ह्यात आरोग्य विभागाचे कार्य सुरळीतपणे सुरू असतानाच, मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. तेव्हापासूनच कोरोनाविरोधात सक्रिय झालेल्या ...
वर्षाच्या प्रारंभापासून जिल्ह्यात आरोग्य विभागाचे कार्य सुरळीतपणे सुरू असतानाच, मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. तेव्हापासूनच कोरोनाविरोधात सक्रिय झालेल्या आरोग्य यंत्रणेने गत नऊ महिने जिल्ह्यात अव्याहतपणे सेवा देण्याचे कार्य केले. ग्रामीण रुग्णालयापासून जिल्हा रुग्णालय ते विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील सर्व यंत्रणांनी अत्यंत प्रभावीपणे रुग्णसेवा केली.
--
८ रुग्णालयांना सेंट्रलाइज ऑक्सिजन सीस्टिम
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक आमूलाग्र बदल घडले आहेत. त्यात जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयाला सेंट्रलाइज ऑक्सिजन सीस्टिम उपलब्ध झाल्या आहेत. त्याशिवाय अन्य ५ तालुक्यांनाही लवकरच सेंट्रलाइज ऑक्सिजन सीस्टिमची उभारणी करण्यात येणार आहे.
नवीन १७३ व्हेंटिलेटरचा पुरवठा
जिल्ह्यात वर्षाच्या प्रारंभीपर्यंत अवघे २२ व्हेंटिलेटर उपलब्ध होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याला नवीन १७३ व्हेंटिलेटर उपलब्ध झाले आहेत. ही सर्व व्हेंटिलेटर ग्रामीण ते उपजिल्हा रुग्णालयांमध्ये वितरित करण्यात आली आहेत. त्यात आता जिल्हा रुग्णालयात एकूण ५२ व्हेंटिलेटर आहेत. ६५ व्हेंटिलेटर ग्रामीण रुग्णालयांमध्ये तर अन्य इतर रुग्णालयांमध्ये कार्यरत आहेत.
कायमस्वरूपी टेस्टिंग लॅब
कोरोनाच्या नमुने तपासणीसाठी परजिल्ह्यांतील लॅबमुळे विलंब होऊ लागल्याने नाशिक जिल्ह्यासाठी एक स्वतंत्र लॅबची मागणी होऊ लागली. त्या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत गोडसे यांच्या खासदार निधीतून जिल्ह्यासाठी सुमारे दोन कोटींची टेस्टिंग लॅब उभारण्यात आली. कोरोनाच्या पश्चातही ही लॅब व्हायरल डिसीजेस (व्हीडीआरएल) तपासणीसाठी नाशिकसाठी उपलब्ध राहणार आहे.
१७ ॲडव्हान्स लाइफ सपोर्ट ॲम्बुलन्स
जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून यापूर्वीच ५३ ॲम्बुलन्स कार्यरत आहेत. त्याचबरोबर, जिल्हा आरोग्य विभागाच्या अन्य ॲम्बुलन्सही रुग्णांना सेवा देत आहेत. त्याशिवाय यंदाच्या वर्षी नवीन १७ ॲडव्हान्स लाइफ सपोर्ट ॲम्बुलन्स जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाल्या असून, या ॲम्बुलन्सच्या माध्यमातून अनेक रुग्णांचा जीव वाचविणे शक्य झाले आहे.
कोविड सेंटर्समुळे भविष्यासाठी सज्जता
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व तालुके आणि प्रमुख शहरांमध्ये उभारण्यात आलेली कोविड सेंटर्स ही भविष्यात कोणताही मोठा आजार, रोगराई पसरल्यास तातडीने कार्यरत करता येणार आहेत. त्यामुळे कोणत्याही मोठ्या साथ-आजाराविरोधातील यंत्रणा केव्हाही उपलब्ध होऊ शकणार आहे.
स्वच्छता, तसेच आरोग्याबाबत जागृती
कोरोनामुळे प्रत्येक नागरिकाला स्वच्छतेचे, तसेच हातपाय सातत्याने धुण्याचे महत्त्व उमजले आहे, तसेच उघड्या अन्नाबाबतही जनजागृती झाली असल्याने, भविष्यात नागरिक प्रत्येक बाबीत हायजीनला महत्त्व देऊ लागले आहेत. त्यामुळे सार्वजनिक स्वच्छता, उघड्यावर थुंकणे यासारख्या समाजातील घातक सवयींनाही काहीसा आळा बसला आहे.
खासगी रुग्णालयांनीही वाढविली उपकरणे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांनीही बेड्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड्स यांसारख्या सुविधांमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांच्या उपकरण आणि साधनसामग्रीतही मोठी वाढ झाली असून, ती भविष्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे.
कोरोना लसींसाठी शीतसाखळी
व्हॅक्सिनेशनसाठी यापूर्वी मर्यादित स्वरूपात असलेली कोल्ड स्टोअर, आईसलाइन रेफ्रीजरेटर, डीप फ्रीजर या सर्व साहित्य आणि उपकरणांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यात २१३ आइसलाइन रेफ्रीजरेटर, २०१ डीप फ्रीजर, कोल्ड बॉक्स ४,३६३, तसेच व्हॅक्सिन कॅरिअर्स २४,७१० उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे कोरोनापश्चात भविष्यातील कोणत्याही लसीकरणासाठीही या शीतसाखळीचा उपयोग होऊ शकणार आहे.